उस्मानपुरा परीसरातील 42 अनधिकृत नळ जोडण्या खंडित...!

 0
उस्मानपुरा परीसरातील 42 अनधिकृत नळ जोडण्या खंडित...!

उस्मानपुरा मोरया चौक परिसरातील 42 अनधिकृत नळ जोडण्या खंडित...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज)- शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत करणाऱ्या अनधिकृत नळ जोडण्यांविरोधात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने धडक कारवाई सुरू केली असून, मनपा आयुक्त श्री. अमोल येडगे यांच्या आदेशानुसार आज दि. 14 मे 2026 रोजी उस्मानपुरा येथील मोरया चौक परिसरात विशेष मोहीम राबवून 150 मिमी उप जलवाहिनी वरील तब्बल 42 अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दि.13 मे रोजी आयुक्तांनी पाणी पुरवठा विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली होती. 

या बैठकीमध्ये सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांना पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी कडक आदेश देण्यात आले. तसेच शहरातील मुख्य व वितरण जलवाहिन्यांवरील अनधिकृत नळ जोडण्या तात्काळ खंडित करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. अधिकृत नळ धारकांना पुरेसा आणि नियमित पाणी पुरवठा मिळावा, हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सदर कारवाई अतिरिक्त आयुक्त-2 श्रीमती कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

या कारवाईत अतिरिक्त शहर अभियंता अनिल तनपुरे, कार्यकारी अभियंता वसंत भोये आणि उप अभियंता किरण धांडे, पथक अभियंता श्री. रोहित इंगळे, शाखा अभियंता श्री. मिलिंद भामरे, कनिष्ठ अभियंता विक्रांत सावंत, सुमित बोराडे यांच्यासह मनपा कर्मचारी आणि नागरी सहाय्यक पथकाचा सक्रिय सहभाग होता.

महानगरपालिकेकडून शहरातील अनधिकृत नळ जोडण्यांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्रपणे सुरू राहणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow