कंपनीतील चोरीचा पर्दाफाश, चार आरोपी जेरबंद, साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त...!

 0
कंपनीतील चोरीचा पर्दाफाश, चार आरोपी जेरबंद, साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त...!

श्री व्यंकटेश कॉम्प्युटर अप्लायन्सेस कंपनीतील चोरीचा पर्दाफाश; चार आरोपी जेरबंद, साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : पैठण तालुक्यातील विडकीन पोलीस ठाण्याच्या पथकाने श्री व्यंकटेश कॉम्प्युटर अप्लायन्सेस प्रा. लि. कंपनीतील लाखो रुपयांच्या चोरीचा यशस्वी उलगडा करत चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे एचआर प्रमुख दीपक सुभाष असरार यांनी दिलेल्या तक्रारीवरून ७ ते २८ जून २०२६ दरम्यान कंपनीच्या आवारातील गोदामात चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरट्यांनी कंपनीच्या मागील भिंतीलगत प्रवेश करून वाल्व्ह, पीसीबी मटेरियल व केबल वायर असा सुमारे 8 लाख 87 हजार 746 रुपयांचा माल लंपास केला होता.

गुन्ह्याचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे विडकीन पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरीचा माल विखरीन परिसरातील भंगार व्यावसायिकास विकल्याचेही निष्पन्न झाले.

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नाजीम करीम शेख (वय 21, राहणार पांगरा, ता.पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, ताहेर बाबुलाल पठाण (वय 19, राहणार पांगरा), किरण भिमराव पतंगे( वय 19, राहणार पांगरा,आणि अर्जुन गौतम बादाडे(वय 18 वर्षे 3 महीने, राहणार चितेगाव, ता.पैठण) यांचा समावेश आहे.

तपासादरम्यान भंगार व्यावसायिक उमर रऊफ कुरेशी यांच्याकडून 4 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, त्याच्यावरही संबंधित कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल देखील जप्त करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विडकीन पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश शेळके, तपास अधिकारी मनोज पाटील व पोहं वाल्मिक निकम, सुरज ढवळे, सतीश साळवे, सायबर सेलचे योगेश तरमळे यांनी केली आहे. या कारवाईबद्दल बिडकीन पोलिसांचे परिसरात कौतुक होत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow