शहागंज येथील 40 दुकानांचे अतिक्रमण जमिनदोस्त
शहागंज येथील 40 दुकानांचे अतिक्रमण जमीनदोस्त...
काल 25 आणि आज 40 अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढले आहे.....
औरंगाबाद, दि.15(डि-24 न्यूज) महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभाग आणि शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता बाधित अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत आज सकाळी नऊ वाजता शहागंज चमन भागात कारवाई करण्यात आली. काल शहागंज येथील मोठी मस्जिद या लगत व्यापाऱ्यांनी व नागरिकांना गुरुवारी अतिक्रमण सह शेड काढण्याबाबत सूचना दिल्या होता परंतु या लोकांनी प्रशासनाला सहकार्य न केल्याने आज सकाळी नऊ वाजता प्रथम दुकानाचा विद्युत पुरवठा खंडित करून सर्व शेड काढण्यात आले. यामध्ये शहागंज मस्जिद लगत रस्त्यावर आलेले 12 ते 13 फूट शेड काढण्यात आले. यामुळे रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होत होती.
यापुढे शहागंज चमन लगत चप्पल आणि कपडा मार्केट मधील दोन्ही बाजूने पाच ते आठ फूट पुढे घेऊन त्यावर मोठा ओटा बांधून पूर्णपणे रस्ता बंद करण्यात आला होता.या ठिकाणी फक्त दुचाकी जाईल असा एकच रस्ता या लोकांनी ठेवला होता. या मध्ये दोन्ही बाजूंच्या एकूण 40 अतिक्रमण धारक व्यापाऱ्यांचे शेड्स काढण्यात आले. या ठिकाणी एक जेसीबी व मजुरांच्या साह्याने ही कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात आली. सर्वांचे लोखंडी शेड निष्कासित करण्यात आल्यामुळे आता हा रस्ता पूर्णपणे मोकळा झाला असून या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेऊन लगेच जेसीबीच्या साह्याने तो रस्ता पूर्ण सपाट करून त्यावर लगेच नवीन रस्ता तयार करण्याबाबत वरिष्ठांनी सूचना दिल्या.
यावेळी सर्वच व्यापाऱ्यांनी या कारवाईस सहकार्य केले. आजच्या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात व अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी सकाळपासून या ठिकाणी बसून ही कारवाई करून घेतली तर नंतर शहागंज मंडई कडे जाणाऱ्या रस्त्यावर ज्या लोकांनी शेड चे अतिक्रमण केले होते त्यांनाही आज सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर ही शनिवारी किंवा सोमवारी कारवाई होणार आहे. सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी ,सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात, उप आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख मंगेश देवरे, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन मिरगे, सहाय्यक आयुक्त वार्ड क्रमांक 2 रमेश मोरे ,अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद ,शेख युनूस, विद्युत विभागाचे कर्मचारी मनपा मजूर जेसीबी चालक यांनी केली. याच वेळी रस्त्याला अडथळा ठरणारे बीएसएनएल चे खांब ज्याच्यावर काही कनेक्शन नव्हते याबाबत वरिष्ठांची खात्री करून ते चार पोल काढण्यात आले.या मुळे हा रस्ता पूर्णपणे मोकळा झाला आहे.अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
What's Your Reaction?