समाजाच्या शेवटच्या घटकाच्या विकासासाठी प्रसार माध्यमांची साथ आवश्यक - सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट
 
                                राज्यस्तरीय वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या बैठकीचे उद्घाटन
समाजाच्या शेवटच्या घटकाच्या विकासासाठी प्रसारमाध्यमांची साथ आवश्यक - सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट
▪️'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने पत्रकारांना सन्मानित करण्याचा निर्णय लवकरच
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज) -सामाजिक न्याय विभाग हा समाजातील तळागाळातील घटकांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेला शासनाचा महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाने हाती घेतलेल्या समाज हिताच्या विविध योजना आणि उपक्रम समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमांची साथ अत्यावश्यक असल्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. समाज कल्याणासाठी योगदान देणाऱ्या पत्रकारांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी यावेळी जाहीर केले.
राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या दोनदिवसीय बैठकीचे उद्घाटन आज पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे होते. यावेळी आमदार प्रशांत बंब, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी, माहिती व जनसंपर्क संचालक (वृत्त - जनसंपर्क) तथा समितीचे सदस्य सचिव किशोर गांगुर्डे, राज्य समितीचे सदस्य आणि विभागीय माहिती उपसंचालक उपस्थित होते.
लोकशाहीमध्ये प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. चांगले काम जनतेपर्यंत पोहोचवणे आणि चुकीच्या गोष्टींना आरसा दाखवणे, हे काम प्रसारमाध्यमे करतात. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने अनेक चांगले उपक्रम हाती घेतले आहेत. या विभागामार्फत राज्यात नवीन 120 वसतिगृहे उभारण्याचे प्रयत्न सुरू असून, आतापर्यंत ४८ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. समाजातील विषमतेची दरी कमी करून सामाजिक सलोखा निर्माण व्हावा, यासाठी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसोबत एकत्रित प्रवेश देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे विद्यार्थीदशेपासूनच सामाजिक ऐक्याची भावना निर्माण होईल, असा उद्देश असल्याचे पालकमंत्री श्री. शिरसाट यांनी सांगितले.
सामाजिक न्याय विभागामार्फत समाजकल्याणासाठी सकारात्मक बदल घडविण्यासाठी पावले उचलली जात आहेत. योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि वंचित घटकांच्या विकासाला गती देण्यासाठी प्रसारमाध्यमांनी सकारात्मक साथ द्यावी, असे आवाहन पालकमंत्री शिरसाट यांनी केले. समाज कल्याण क्षेत्रात, विशेषतः अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित केले जाते. यापुढे या क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांनाही या पुरस्काराने गौरवण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
योजनांच्या अंमलबजावणीत प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची: मंत्री अतुल सावे
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ अशी प्रसारमाध्यमांची ओळख आहे. आजही समाजाला दिशा देण्याचे आणि शासनाच्या योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य प्रसारमाध्यमे करतात. योजनांबाबत जनतेच्या प्रतिक्रिया मांडणे आणि आवश्यक बदल सुचवणे यातही प्रसारमाध्यमांची भूमिका मोलाची आहे. त्यामुळे शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत प्रसारमाध्यमांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी सांगितले. इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत त्यांनी माहिती दिली.
सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीत पत्रकारांचा सहभाग घ्यावा: यदु जोशी
सामाजिक न्याय आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग समाजातील मोठ्या घटकांच्या कल्याणासाठी कार्यरत आहेत. शासनाच्या प्रतिमानिर्मितीत या विभागांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे या विभागांच्या योजनांची प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. यासाठी विभागीय स्तरावर स्वतंत्र समिती स्थापन करून त्यात पत्रकारांचा सहभाग घेतल्यास योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी होईल, असे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांनी सांगितले. तसेच, अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या कल्याणासाठी योगदान देणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रसारमाध्यमांमुळे लोकशाही बळकट झाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात तंत्रज्ञानाचे चांगले बदल तसेच काही दुष्परिणामही दिसत आहेत. याबाबत प्रसारमाध्यमांनी समाजाला मार्गदर्शन करून येणाऱ्या आव्हानांची जाणीव करून द्यावी, असे मत आमदार प्रशांत बंब यांनी व्यक्त केले.
प्रसारमाध्यमांमुळे प्रशासकीय कामकाजात सकारात्मक बदल घडतात, असे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी नमूद केले. तसेच, हुंडाबळी, बालविवाह, गर्भलिंग निदान आणि स्त्री-भ्रूण हत्या यासारख्या चुकीच्या प्रथांना आळा घालण्यासाठी प्रसारमाध्यमांनी पुढाकार घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
प्रारंभी माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक किशोर गांगुर्डे यांनी प्रास्ताविकात बैठकीच्या आयोजनाची भूमिका विशद केली आणि पत्रकारांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष डॉ. माधव सावरगावे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सूत्रसंचालन जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी केले.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            