हर्सुल मध्ये 8 एकरांवरील 700 अनधिकृत प्लाॅटवर मनपाचा हातोडा...!
हर्सूलमध्ये 8 एकरांवरील 700 अनधिकृत प्लॉटवर मनपाचा हातोडा...!
3 जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत ले-आऊट जमीनदोस्त; पक्क्या घरांनाही नोटिसा बजावणार
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज) - शहरात अनधिकृत प्लॉटिंगच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भूमाफियांविरोधात महानगरपालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार मंगळवारी अतिक्रमण विभागाच्या पथकाने हर्सूल परिसरातील तब्बल 8 एकर क्षेत्रावरील सुमारे 700 अनधिकृत प्लॉटच्या सीमा व खुणा जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केल्या.
हर्सूल येथील गट क्रमांक 275 मध्ये मनपाच्या पथकाने पहिली मोठी कारवाई केली. दादासाहेब जनार्दन औताडे, महादेव नारायण वाणी आणि रवींद्र सुदाम औताडे यांच्या मालकीच्या सुमारे 4.5 एकर क्षेत्रावर करण्यात आलेल्या बोगस ले-आऊटच्या हद्दी व खुणा नष्ट करण्यात आल्या. या ठिकाणी सुमारे 350 ते 400 अनधिकृत प्लॉट तयार करण्यात आले होते.
यानंतर पथकाने गट क्रमांक 61 येथे कारवाई केली. शेख रिजवान शेख रियाज व इतरांच्या मालकीच्या सुमारे 3.5 एकर क्षेत्रावर अनधिकृत प्लॉटिंग करण्यात आली होती. येथील सुमारे 280 ते 290 प्लॉटच्या सीमारेषा व खुणा जेसीबीच्या सहाय्याने पूर्णपणे हटविण्यात आल्या.
60 ते 65 पक्क्या घरांनाही नोटिसा
दरम्यान, हर्सूल येथील गट क्रमांक 27 मध्ये सुरेंद्र कोलते यांच्या जागेवर मनपाची परवानगी न घेता सुमारे 60 ते 65 पक्क्या घरांचे बांधकाम झाल्याचे कारवाईदरम्यान समोर आले. तसेच पाच रिकाम्या प्लॉटला तार कंपाउंड करण्यात आले होते. या अनधिकृत बांधकामांची मनपाने गंभीर दखल घेतली असून संबंधित पक्क्या घरांना कायदेशीर नोटिसा बजावण्यात येणार आहेत. याबाबत परिसरात उद्घोषणाही करण्यात आली.
ही कारवाई सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक आयुक्त उदय मानवतकर, संजय सुरडकर, इमारत निरीक्षक संतोष वाचासुंदर, रवींद्र देसाई यांच्यासह अतिक्रमण विभागाच्या पथकाने ३ जेसीबी आणि ३ हायवा ट्रकच्या सहाय्याने अनधिकृत ले-आऊटवर कारवाई केली.
अनधिकृत ले-आऊट तयार करणाऱ्यांविरोधात हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
महसूल व नोंदणी अधिकाऱ्यांची आज बैठक
शहरात वाढत असलेल्या अनधिकृत व अवैध प्लॉटिंगला आळा घालण्यासाठी मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज, बुधवारी सकाळी 10 वाजता मनपा मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला उपजिल्हाधिकारी, अपर तहसीलदार तसेच सर्व दुय्यम निबंधकांना उपस्थित राहण्याचे पत्र मनपाच्या अतिक्रमण विभागाने दिले आहे. अनधिकृत प्लॉटिंगला आळा घालण्यासाठी महसूल, नोंदणी आणि मनपा प्रशासनामध्ये समन्वय साधण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.
What's Your Reaction?