हर्सूल...टिडीआर नको अगोदर मोबदला द्या, धार्मिक स्थळांना जागा दिल्याशिवाय हलवणार नाही...

 0
हर्सूल...टिडीआर नको अगोदर मोबदला द्या, धार्मिक स्थळांना जागा दिल्याशिवाय हलवणार नाही...

हर्सुलकरांची मागणी, रोख मोबदला द्या, धार्मिकस्थळांना पर्यायी जागा द्या..‌

महापालिका व पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक, सहायक पोलिस आयुक्तांनी केले मार्गदर्शन, टिडिआर देणार असल्याचे मनपा अधिका-यांनी सांगताच याला विरोध असल्याचे मालमत्ताधारकांनी सांगितले...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज) - आम्ही अतिक्रमण केलेले नाही, आमच्या मालकीच्या जागा आहेत. यापूर्वीही रस्ता रुंदीकरणासाठी आमच्या जागा सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतल्या त्याआधी त्यांनी मोबदला दिला होता आताही रस्ता रुंदीकरणाला आमचा विरोध नाही, मात्र आधी मोबदला द्या त्यानंतरच मालमत्तेला हात लावा. रस्ता बणवायचा आठ दिवस अगोदर सांगा स्वतः मालमत्ता काढून घेवू. अगोदरच आमच्या मालमत्ता गेली आता आणखी जाणार आहे आम्ही रस्त्यावर आलो आहे, मुलांचे शिक्षण सुरु आहे, फिस कोठून भरायची, पावसाळ्यात व्यवसाय बंद, बेघर होवून कोठे जाणार दुसरीकडे आम्हाला राहायला जागा नाही रोख पैसे अगोदर दिले तर नियोजन करता येईल यासाठी वेळ लागेल. थेट हातोडा चालवू नका... बाधित होणाऱ्या धार्मिकस्थळांना पर्यायी जागा द्या, धार्मिक स्थळांचे स्थलांतर पर्यायी जागा दिल्याशिवाय करणार नाही अथवा सुपारी हनुमान मंदीरासारखा हनुमान मंदीर संस्थानच्या दोन्ही बाजूला रस्ता करा. टि-पाॅईंट ते सावंगी पर्यंत उड्डाणपुल केल्यास किंवा दिल्लीगेट सारखा शंभर फुटी (30 मीटर) हर्सुल रस्ता ठेवला तर मालमत्ता बाधित होणार नाही अशी भूमिका हर्सूलवासियांनी प्रशासना सोबत झालेल्या बैठकीत भुमिका मांडली.

मनपा प्रशासनाने मोबदला व इतर समस्यांवर सोल्यूशन काढावे आमची भुमिका ही महापालिकेच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे. सर्व गोष्टीचे सोल्यूशन निघाले आहे असे ज्या दिवशी मनपा आम्हाला सांगेल त्यादिवशी आम्ही त्यांच्यासोबत पूर्ण ताकदीने उभे राहू तुमचे समाधान झाल्यानंतर यात कुणीही आडकाठी आणण्याचा प्रयत्न करु नये. 6 किंवा 7 ऑगस्ट हि तारीख हर्सूल येथील कार्यवाहीसाठी ठरवण्यात आलेली असून त्याआधी मनपा प्रशासन यावर निर्णय घेईल अशी अपेक्षा सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) सुदर्शन पाटील यांनी व्यक्त केल्याचे नागरिकांनी सांगितले.

हर्सूल ते सावंगी मनपा हद्दीपर्यंत 60 मीटर रस्ता रुंदीकरण करण्याची घोषणा महापालिकेने केल्यापासून हर्सूलवासियांमध्ये चिंता आणि दहशतीचे वातावरण पसरलेले आहे, या पार्श्वभूमीवर बुधवारी महापालिका प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलीस ठाण्याजवळील गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात नागरिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला अतिक्रमण समन्वय अधिकारी संजय सुरडकर, एसीपी सुदर्शन पाटील, हर्सूलचे पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ, उपनिरीक्षक गणेश केदार, झोन क्र.4 चे सहाय्यक आयुक्त अशोक गिरी, अतिक्रमण विभागाचे निरीक्षक सय्यद जमशेद आदींची उपस्थिती होती. बैठकीत अधिकाऱ्यांनी नागरिकांची मते जाणून घेतली. यावेळी जवळपास सर्वच नागरिकांनी रोख मोबदला देण्याची मागणी केली. तसेच दोन मशिदी, मंदिर, कब्रस्थान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आदी बाधित होत असून, धार्मिकस्थळांना पर्यायी जागा देण्याची तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा चौकात बसवावा अशी मागणी बैठकीत येथील नागरीकांनी केली. टीडीआर आम्ही घेणार नाही, घरात खायला धान्य नाही, टीडीआर घेवून काय करणार. आम्ही मालमत्ताधारक आहे, आमच्याकडे पीआर कार्ड आहेत. यापूर्वीही आमची जागा घेतली, रस्ता रुंद केला, त्याआधी आम्हांला मोबदला दिला. याकडेही नागरिकांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. तसेच मोबदला न देताच आम्हांला रस्त्यावर आणले तर कुटुंबासह आत्मदहन करण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय नाही, असा इशाराही नागरिकांनी दिला. नागरिकांचे पुनर्वसन कोण करणार, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला.

टिडीआरसाठी अर्ज करा - सुरडकर

प्रशासनाची भूमिका टीडीआर देण्याची आहे. बाधित मालमत्ताधारकांनी टिडीआरसाठी अर्ज करावा. आपल्याला लवकरात लवकर टिडीआर देण्यात येईल, अशी भूमिका प्रशासनतर्फे मांडण्यात आली. तसेच धार्मिक स्थळांच्या पर्यायी जागेबाबत प्रशासन विचार करून आपली भूमिका स्पष्ट करेल, अशी माहिती सुरडकर यांनी यावेळी दिली. 

महापालिकेच्या स्थापनेपूर्वीपासून आम्ही इथे राहत आहे. आमच्या वडिलोपार्जित जागा आहेत. G-20 च्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यासाठी आमच्या जागा घेतल्या, त्याआधी मोजणी, पंचनामा करून रेडीरेकनरच्या दोन पट मोबदला दिला. आता शहरातील इतर भागाप्रमाणे नुसती पाडापाडी करू नका. मोबदला द्या, जेव्हा खरंच रस्ता करायचा असेल, तेव्हा आठ दिवस आधी सांगा, आम्ही स्वत:हून जागा मोकळी करून देवू, पाहिजे तर बॉण्डवर लिहून घ्यावे - संजय औताडे, माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समीती....

हर्सूल गावकऱ्यांचा टिडीआरला विरोध आहे. आधीच अर्धे घर गेलेले आहे, आता उरलेले घर जात आहे. घर तुटल्यास टिडीआर घेवून काय करणार....? पैसे मिळाल्यास दुसरे घर घेता येईल. मनपा आयुक्तांनी गावकऱ्यांचे दु:ख समजून घ्यावे शनिवारी ग्रामस्थांची भेट घेवून चर्चा करणार असल्याचे आश्वासन मनपा आयुक्तांनी दिले आहे. पुरातन मस्जिद, मंदीर, पुतळा व कब्रस्तान बाधित होत आहे‌. धर्म गुरु व गावकरी जे म्हणतील धार्मिक स्थळाबाबत निर्णय घेवू. पर्यायी जागा मनपाने धार्मिक स्थळांना उपलब्ध करुन द्यावी त्यानंतरच हलवू नसता हात लावू देणार नाही - युनूस पटेल, माजी नगरसेवक, काँग्रेस

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow