सरकारचे पॅकेज हि सर्वात मोठी थाप, विरोधीपक्षनेते नाही मग दोन उपमुख्यमंत्री कशासाठी - उध्दव ठाकरे

सरकारचे पॅकेज हि सर्वात मोठी थाप, विरोधीपक्षनेता नाही मग दोन उपमुख्यमंत्री कशासाठी - उध्दव ठाकरे
उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघाला शेतकऱ्यांचा ‘हंबरडा मोर्चा’
विभागीय आयुक्तांना दिले विविध मागण्यांचे निवेदन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.11(डि-24 न्यूज)- महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले पॅकेज ही आतापर्यंतची सर्वात मोठी थाप आहे. अशी थाप यापूर्वी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी मारली नाही. इतिहासातील सर्वात मोठी थाप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारली आहे. 50 खोके घेणा-यांनी 50 हजारांची मदत द्यावी. विरोधीपक्षनेते पदासाठी म्हणे संख्याबळ नाही. मग संविधानाने उपमुख्यमंत्रीपद नसताना दोन उपमुख्यमंत्री कशासाठी. आम्ही त्यांना मानत नाही. आम्ही रस्त्यावर उतरुन मानगुटीवर बसून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम आहोत. अशी टिका मराठवाडाव्यापी हंबरडा मोर्चात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले शहरात रस्त्यावर जागोजागी होर्डिंग्ज लावण्यात आले. त्यावर शेतकऱ्यांना 31 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. तुम्हीही ते पाहा, त्या होर्डिंग्जवर शेतकरी नाहीत यांचेच सतरंज्या उचलणारे आहेत. या लोकांना शेतकऱ्यांचे काहीच पडले नाही. हेच लोक मदत करणार आणि स्वतःची पाठ थोपटून व खाजवून देणार. अभिनंदन करायचेच होते तर शेतकरी या सभेला का आला...? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवार, 11 ऑक्टोबर रोजी मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांचा हंबरडा मोर्चाने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी झालेल्या जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी खास ठाकरे शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. तसेच शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत सरकारला सोडणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. सभेनंतर विभागीय आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतकऱ्यांची संपूर्णपणे कर्जमाफी करण्यात यावी, पीक विम्याचे निकष पूर्ववत करावे, घरे व पशुधनासाठी निकष शिथिल करुन मदत देण्यात यावी आदी मागण्यांसाठी शिवेसना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीचौकातून शेतकऱ्यांचा मराठवाडाव्यापी हंबरडा मोर्चा काढण्यात आला होता. क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चास सुरुवात करण्यात आली. मोर्चात शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, आ. अरविंद सावंत, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, परभणीचे खासदार संजय जाधव, खा. ओमराजे निंबाळकर, खा. नागेश पाटील आष्टीकर, आ. कैलास पाटील, आ. राहुल पाटील, प्रवीण स्वामी, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, परशुराम जाधव, रोहिदास चव्हाण, सुनील काटमोरे, उपनेते लक्ष्मणराव वडले, सचिन घायाळ, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, गणेश वरेकर, ज्योतिबा खराटे, उल्हास गीराम, संतोष सोमवंशी, राजू वैद्य, रणजीत पाटील. भुजंग पाटील आदी सहभागी झाले होते.
क्रांतीचौकातून निघालेला हंबरडा मोर्चा पैठणगेटमार्गे निघालेला गुलमंडी चौकात दाखल झाला. गुलमंडी चौकात मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी बोलतांना विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी राज्यसरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले पॅकेज फसवे असून शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांची कर्जमाफी न झाल्यास दिवाळीनंतर मंत्रालयावर धडक देवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी बोलतांना शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच लोकसभा निवडणुकीत विजयी होण्यासाठी संदीपान भुमरे यांनी 120 कोटी रुपये वाटले असल्याचा आरोप केला.
What's Your Reaction?






