हाॅकी स्टिकच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू, पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर उशिरा रात्री दफनविधी संपन्न...!

 0
हाॅकी स्टिकच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू, पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर उशिरा रात्री दफनविधी संपन्न...!

हॉकी स्टिकच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू; दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल...

आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी जीन्सी पोलिस ठाण्यात नातेवाईकांचे आंदोलन...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज)- शहरातील जिन्सी पोलीस ठाणे हद्दीत माशा विक्रीच्या दुकानावरून झालेल्या वादात एका युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुमारे 10 दिवसांपूर्वी झालेल्या वादामध्ये हॉकी स्टिकने गंभीर मारहाण करण्यात आलेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणात खुनाचे कलम वाढवत दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 6 जून 2026 रोजी गंजे शहीदा मशिदीजवळ माशा विक्रीचे दुकान लावण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला होता. सुरुवातीला झालेली शाब्दिक बाचाबाची पुढे हाणामारीत परिवर्तित झाली. यावेळी आरोपी अक्रम आणि माजेद यांनी युसूफ खान व त्यांचा पुतण्या शाहरुख खान यांच्यावर हॉकी स्टिकने हल्ला केल्याचा आरोप आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले होते.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शाहरुख खान यांची प्रकृती चिंताजनक होती. वैद्यकीय पथकाने त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले, मात्र सोमवारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. शाहरुख यांच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

या घटनेनंतर मृतकाच्या नातेवाईकांमध्ये तसेच स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारी घेतली आहे. पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर शवविच्छेदन झाल्यानंतर उशिरा रात्री नातेवाईकांनी दफनविधी केले.

जिन्सी पोलिसांनी सुरुवातीला दाखल गुन्ह्यात आता खुनासह इतर गंभीर कलमांची वाढ केली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. पोलिसांकडून संशयितांच्या संभाव्य ठिकाणी छापेमारी सुरू असून प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवाल, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणातील दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नसून कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, शाहरुख खान यांच्या मृत्यूनंतर हे प्रकरण आता खुनात रूपांतरित झाले असून शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच किरकोळ वादातून वाढणाऱ्या गंभीर घटनांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

6 जूनला घडली होती मारहाणीची घटना...

6 जून रोजी पाच वेळा नमाज अदा करणारे शाहरुख हे नमाजसाठी जात असताना त्यांना रस्त्यात काही लोक त्यांच्या काकांवर मारहाण करत असल्याचे दिसले. शाहरुख यांनी तत्काळ तेथे जाऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि "भाई, का मारत आहात...?" असा प्रश्न विचारला.

यावेळी हल्लेखोरांनी शाहरुख यांना "तू कोण आहेस...?" असे विचारले. त्यावर शाहरुख यांनी "मी यांचा पुतण्या आहे," असे उत्तर दिले. एवढे सांगताच आरोपींनी थेट त्यांच्या डोक्यावर हॉकी स्टिकने जोरदार वार केला.

या गंभीर हल्ल्यानंतर शाहरुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल 9 ते 10 दिवस ते कोमामध्ये मृत्यूशी झुंज देत होते. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. अखेर 15 जून रोजी सायंकाळी मगरिबच्या नमाजानंतर सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, पीडित कुटुंबीयांनी या प्रकरणाबाबत पोलीस निरीक्षकांकडे आरोपींच्या अटकेची विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, "आरोपी सापडत नाहीत, तुम्हीच शोधा," असे उत्तर पोलिसांकडून देण्यात आले.

विशेष म्हणजे, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये 10 ते 12 जण स्पष्टपणे दिसत असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, पोलिसांकडून केवळ दोनच जण सहभागी असल्याचे सांगितले जात असल्याने या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित आरोपींना तातडीने अटक करून निष्पक्ष तपास करण्याची मागणी नातेवाईक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow