40 कोटींची पाणीपुरवठा योजना तरीही बजाजनगर तहानलेलाच, 6 मार्चला उबाठाचे घडा फोडो आंदोलन...

 0
40 कोटींची पाणीपुरवठा योजना तरीही बजाजनगर तहानलेलाच, 6 मार्चला उबाठाचे घडा फोडो आंदोलन...

बजाजनगरचा पाणीप्रश्न पेटला...! 15 हजारांच्या पगारात 10 हजारांचे पाणी...

'तहानलेल्या' वाळूजमध्ये 6 मार्चला 'घडा फोडो' शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज)- आशियातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत अशी ओळख असलेल्या वाळूज एमआयडीसीतील कामगार आज हंडाभर पाण्यासाठी टाहो फोडत आहेत. "बियर कंपन्यांना मुबलक पाणी, पण सामान्य जनतेला ठणठणाट" अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते सुरेश सोनवणे यांनी प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत. या भीषण पाणीटंचाईच्या निषेधार्थ आगामी 6 मार्च रोजी सोलापूर-धुळे हायवेवर भव्य 'घडा फोडो' आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

कामाच्या कष्टापेक्षा पाण्याचेच हाल जास्त...!

वाळूज, बजाजनगर आणि सिडको परिसरात सुमारे 10 लाख लोकसंख्या आहे. येथील बहुतांश नागरिक कष्टकरी कामगार आहेत. धक्कादायक वास्तव म्हणजे, ज्या कामगाराचा पगार अवघा 15 हजार रुपये आहे, त्याला दरमहा 10 हजार रुपये केवळ टँकरच्या पाण्यासाठी मोजावे लागत आहेत. तब्बल 8-8 दिवस नळाला पाणी येत नसल्याने महिलांना रात्रभर जागून पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

बियर कंपन्यांचे पाणी कनेक्शन तोडणार: सोनवणे यांचा इशारा....

पत्रकार परिषदेत बोलताना सुरेश सोनवणे यांनी प्रशासकीय यंत्रणेवर कडक ताशेरे ओढले. "एमआयडीसीमध्ये बियर तयार करणाऱ्या कंपन्यांना हवं तितकं पाणी मिळतं, मग राबणाऱ्या जनतेला का नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जर प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही, तर या कंपन्यांचे पाणी बंद करून ते जनतेला वळवण्याचा आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

40 कोटींच्या योजनेचे 'गाजर'; ग्रामपंचायत फक्त कागदावर...!

पाणीपुरवठ्यासाठी 34 ते 40 कोटी रुपयांची योजना मंजूर असूनही प्रत्यक्षात थेंबभर पाणी मिळाले नाही. गेल्या चार वर्षांपासून केवळ पाइपलाइनचे पाइप टाकून ठेवले आहेत, पण पाण्याचा पत्ता नाही. स्थानिक ग्रामपंचायत पूर्णपणे निष्क्रिय झाली असून केवळ 'कागदी घोडे' नाचवले जात असल्याचा आरोपही सोनवणे यांनी केला.

6 मार्चला हायवे जाम होणार...!

या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 6 मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता खवडा डोंगर, धुळे-सोलापूर हायवेवर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत 'घडा फोडो' आंदोलन होणार आहे. जोपर्यंत जनतेला हक्काचे पाणी मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow