विधानसभेची लढाई महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे, ठाकरेंनी शिवसंकल्प मेळाव्यात फुंकले निवडणुकीचे रणशिंग...!

 0
विधानसभेची लढाई महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे, ठाकरेंनी शिवसंकल्प मेळाव्यात फुंकले निवडणुकीचे रणशिंग...!

मराठा-ओबीसीत भांडणे लावू नका, केंद्रात आरक्षणाची मर्यादा वाढवा मी पाठींबा देतो- उध्दव ठाकरे 

छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.7(डि-24 न्यूज) राज्यातील मराठा आणि ओबीसी, धनगर आरक्षणाच्या मुद्यावर राजकारण्यांशी चर्चा करून तोडगा निघणार नाही. मागे झालेल्या बैठकांमध्येही तोडगा निघालेला नाही. याकडे लक्ष वेधत, सर्व समाजातील विचारवंत, मनोज जरांगे पाटील, हाके यांना बोलावून, त्यांच्याशी सरकारने चर्चा करावी. आणि खरंच ते देऊ शकता का...? हे त्यांना सांगा आरक्षणासाठी अनेकजण जीव देत आहेत, समाजात तेढ निर्माण होत आहे. पिढ्या संपत आहे, पण लढा संपत नाही असे उद्गार काढत मराठा आणि ओबीसी एकमेकांच्या उरावर बसवू नका, असे आवाहन शिवसेना (उबाठा) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा वाढविली तर तिढा सुटु शकतो. हि मर्यादा वाढविली तर मी पाठींबा देईल परंतु आश्वासन देऊन मराठा-ओबीसी-धनगर समाजाला झुलवू नका. यामुळे समाजा समाजात भांडण लागत आहे. 

शहरातील सूर्या लॉन्स येथे आयोजित शिवसंकल्प मेळाव्यातून शिवसेनेने (उबाठा) गटाने विधानसभेचे रणशिंग फुंकले. मेळाव्याला माजी खासदार विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार उदयसिंह राजपूत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, महानगरप्रमुख राजु वैद्य, विभागीय सचिव अशोक पटवर्धन, महीला आघाडी संघटक ज्योती ताई ठाकरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांच्यासह नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

ठाकरे पुढे म्हणाले की, आरक्षण देण्यासाठी न्यायालयीन लढाईतही आपल्याला अपयश आले आहे़ बिहार सरकारने दिलेले आरक्षणही रद्द झाले. आरक्षणासाठी टक्केवारी वाढवणे हे राज्य सरकारचे नव्हे तर केंद्र सरकारच्या हातात आहे, हे सगळ्यांना समजवून सांगा. आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी उद्या राजकीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राजकारण्यांना बोलावू नका, तर सर्व समाजातील विचारवंत, जरांगे पाटील, हाके तसेच धनगर व इतर समाजातील लोकांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करा असा सल्ला त्यांनी सरकारला दिला. सर्व समाजातील नेते व जनतेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याकडे जाऊन त्यांच्यासमोर म्हणणे मांडावे आरक्षणाची टक्केवारी वाढवण्याची गरज असेल, तर विधानसभेत ठराव आणा, तो ठराव मंजूर करून लोकसभेत पाठवा या ठरावाला दोन्ही सभागृहात शिवसेना आजच पाठिंबा देते, असे ठाकरे यांनी जाहिर केले.

आरक्षणावर आजपर्यंत झालेल्या बैठकांमध्ये काही तोडगा सरकारने काढला नाही. त्यानंतरही आगी लावण्याचे प्रकार सुरू आहेत. जनतेला न्याय हक्काचे मिळाले पाहिजे, पण ते आपआपसांत भांडून नाही. तुमच्या पेटलेल्या घरांवर हे लोक त्यांच्या पोळ्या भाजत असतील, तर आधी राजकारणातील घरे जाळा, त्यांची घरे जाळा असे माझे म्हणणे नाही. त्यांना निवडणुकीत पाडा, हा त्याचा अर्थ असल्याचे उध्दव ठाकरे म्हणाले.

भांडणे लावणा-यांना गाडा

मराठा म्हणजे अठरा पगड जाती, त्यांच्यात दुही माजवून युद्ध जिंकता येते, हे अब्दाली आणि औरंगजेब यांनी ओळखले होते़ त्यांनी आपली बलस्थाने आणि कमकुवत स्थाने सांगून ठेवली असून, आजचे अब्दाली आणि औरंगजेबही त्याचाच वापर करत आहे़ एकमेकांत भांडू नका, एकत्र येऊन भांडणे लावणा-यांना गाडा. दिल्लीकरांना वाकवून आपले म्हणणे पदरात पाडून घ्या, अशी साद ठाकरे यांनी घातली. अंमलबजावणीचा दुष्काळ

या सरकारच्या पापाचा घडा भरल्याने, तो लपवण्यासाठी ते योजना जाहिर करत आहेत. मोदींनी मागील दहा वर्षांत जाहीर केलेल्या योजना अमलात का आणल्या नाहीत. लाडकी बहिण योजनेद्वारे सरकारने पुन्हा डाव टाकला आहे़ तीन महिन्यापुरतेच हे सरकार असून, सरकारमध्ये योजनांचा सुकाळ आहे, पण अंमलबजावणीचा दुष्काळ आहे. बहीणींसाठी योजना जाहीर केली याचे स्वागत आहे मग भावासाठी काय. शिकलेले युवक सध्या बेरोजगार आहेत. दरी निर्माण करु नका, शेतकरी आत्महत्या करत आहेत त्यांचे वीजबिल माफ करुन चालणार नाही त्यांना कर्जमुक्त करा. भाऊ बहीनीत भेदभाव निर्माण करु नका. थकबाकी वसूल करु नका त्यांना दिलासा द्या, माझा पक्ष फोडला चिन्ह हिसकावले अशाच प्रकारे शरद पवारांचा पक्ष फोडला चिन्ह हिसकावले आता जनतेचे घर फोडण्याचे प्रकार सुरू झाले आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

लोकसभा निवडणुकीतील लढाई हि आपल्या देशाची, संविधानाची आणि लोकशाहीची लढाई होती तर या विधानसभेची निवडणुक हि ती महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्तित्वाची लढाई आहे. महाराष्ट्र हा साधुसंतांचा, वीरांचा, मर्दांचा अशी ओळख जगभरात आहे, ती ओळख अशीच कायम ठेवणार की, लाचार, गद्दारांचा महाराष्ट्र अशी ओळख होवू देणार, हे आपणच ठरवायचे आहे़, मी लाचारी, गद्दारांचा महाराष्ट्र अजिबात होवू देणार नाही. माझ्या शिवरायांच्या भगव्याला कलंक लागू देणार नाही, अशी शपथ घेवून मी मैदानात उतरल्याचे यावेळी ठाकरे

म्हणाले.

संभाजीनगर गमावल्याचे शल्य...काय चूक झाली जनतेला विचारा.‌..

पानीपतच्या लढाईप्रमाणे कोकण आणि संभाजीनगरचा पराभव जिव्हारी लागला आहे परंतु मी आता संभाजीनगर जिंकल्याशिवाय थांबणार नाही. महाराष्ट्रात भाजपा व गद्दारसेनेला 40 वरून 9 वर आणले आहे़. पण या विजयात संभाजीनगरची हक्काची जागा गमावल्याचे शल्य मनात आहे. आपण अतिआत्मविश्वासाने हि जागा लढलोे का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हरल्याने आयुष्य संपत नाही, पुन्हा लढेन, आणि जिंकेन, या इर्षेने मी संभाजीनगरात आलो आहे, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. चंद्रकांत खैरे पक्षाशी एकनिष्ठ राहिले म्हणून त्यांना उमेदवारी दिली होती. त्यांनाहि अमिषे दाखवली त्यांनी पक्ष सोडला नाही म्हणत ठाकरेंनी खैरेंचे कौतुक केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी संभाजीनगरातून मेळाव्याचा शुभारंभ केला.

निवडणुका हरल्याने नव्हे तर जिंकण्याची जिद्द संपल्याने आयुष्य संपते. पण पराभव काय झाला, कसा झाला, याचा विचार केलाच पाहिजे मुख्यमंत्री असताना शहरातील गुंठेवारी, समांतर योजनेचा प्रश्न, रस्त्याचे प्रश्न सोडविला व विविध विकास कामे केली. शहराचे नाव संभाजीनगर केले विमानतळाचे नावही बदलाचा ठरावही केला आहे मात्र मागील 2 वर्षात या सरकारने काहीच केले नाही. मतदारसंघाचे नाव आजही औरंगाबाद आहे याकडेही ठाकरे यांनी लक्ष वेधले.

आपण कुठे कमी पडलो, याची कारणे शोधा घरांघरामध्ये जाऊन आमचे काय चुकले हे जनतेला विचारा अशी सूचनाही ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केली. आजची भाजप हि अडवाणी, वाजपेयी यांची नाही, व्यापा-यांची झाली आहे. हे आता भाजपमधील लोकांनाही कळू लागल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढत असल्याचे ते म्हणाले़

अंबादास दानवे यांनी आपल्या भाषणात काय म्हणाले...

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारी लागा. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 9 मतदारसंघात शंभर टक्के तयारी करा. बुथनिहाय सदस्य नोंदणी करा, असेही आवाहन जिल्हाप्रमुख तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांना केले. उध्दव ठाकरे सरकारने शहरात अडीच हजार कोटींची कामे केली, मात्र या सरकारच्या काळात शहरातील विकासाच्या योजना थांबलेल्या आहेत या सरकारच्या पापाचा घडा भरला असून, मतदाररुपी श्रीकृष्ण त्यांना बुडविल्याशिवाय राहणार नाही. मशाल हाती घेऊन सरकारने केलेले पाप जाळून टाकण्याचा संकल्प त्यांनी केला.

गटबाजीत जायचे नाही; गेल्यास राजकारण संपते

खैरेंचा राजू शिंदेंना सल्ला... राजकीय आव्हांनांचा पडला विसर

उध्दव साहेबांबद्दल रोज काही ना काही उलटसुलट बोलणा-या त्या गद्दाराला आपल्याला पाडायचे आहे. त्याचा खात्मा करायचा आहे. पण गटबाजीत जायचे नाही. गटबाजीत गेले तर राजकारण संपते असा सल्ला शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजपमधून आलेल्या राजू शिंदे यांना दिला. विशेष म्हणजे भाषणाचा शेवटही त्यांनी याच शब्दांनी करत पक्षातील गटबाजीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या मेळाव्यात आयोजकांनी खैरेंना 'राजकीय आव्हाने' हा विषय दिला होता.

लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून राजू शिंदेला पक्षात येण्याबाबत सांगत होतो, आधी आला असतास, तर मी निवडून आलो नसतो का, असे खैरे शिंदेंना उद्देशून म्हणााले. भुमरेंना 25 हजार मतांची लीड दिली, मला पण दिली असती हरकत नाही. आपल्याला आता आपल्याला खूप काम करायचे आहे जातीवादी पक्ष एमआयएम आता पूर्व आणि मध्य मतदारसंघात डोके वर काढू लागला आहे़, हे दोन्ही मतदारसंघ आपले आहेत. जिल्ह्यातील सर्व 9 जागा या शिवसेनेच्या आहेत. या जागा आणण्यासाठी ताकदीने मशाल हातात घ्या असे आवाहन खैरे यांनी यावेळी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow