अतिक्रमण हटाव मोहिमेच्या निषेधार्थ झोपडपट्टी महापंचायत - अॅड विवेक चव्हाण

अतिक्रमण हटाव मोहिमेच्या निषेधार्थ झोपडपट्टी महापंचायत :ॲड.भाई विवेक चव्हाण
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज)- महापालिकेच्या वतीने अतिक्रमणाच्या नावाखाली दलित गरीब अल्पसंख्याक समाजाच्या वसाहती पाडण्याची मोहीम हाती घेतली आहे. आत्तापर्यंत हजारो झोपडपट्टीवाशीय बेघर झाले आहेत या मोहिमेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरात येत्या दहा दिवसात झोपडपट्टी महापंचायतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भारतीय दलित कोब्रा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. भाई विवेक चव्हाण यांनी आज शुक्रवारी दि. 4 जुलै रोजी एका पत्रकार परिषदेत दिली.
महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतले आहे त्यात संजयनगर मुकुंदवाडी भागातील रस्त्यावरील घरे पाडण्यात आले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी ॲड. विवेक चव्हाण हे शहरात आले होते. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते पुढे म्हणाले न्यायालयाच्या निर्णयानंतर संभाजीनगर महापालिकेने संविधान व कायद्याची अंमलबजावणी न करता मागील पंधरा दिवसात हजारो अतिक्रमणे पाडून हजारो कुटुंबीय बेघर झाली त्यासाठी प्रचंड पोलीस, प्रशासनाचे शेकडो ट्रक वाहने जेसीबी व पोकलेनचा वापर केला गेला. या वसाहती उभ्या करताना निळ्या झेंडा खाली काही आंबेडकरी नेत्यांनी मोठे योगदान दिले त्यात माझाही सहभाग होता. कायद्याची भीती दाखवत लोक बेघर व भयभीत झाले आहे. अजूनही काही दिवसात हजारो लोक बेघर होतील लोकांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला ते सर्वजण आज गायब आहेत. त्यामुळे शेकडो लोकांनी मला विनंती केल्यामुळे मी स्वतः यात लक्ष घालण्याचे ठरवले आहे मी या लोकांना वाऱ्यावर सोडू शकत नाही या सर्वांचे पुनर्वसन होण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. अतिक्रमण हटाव कारवाईच्या विरोधात व तसेच सर्वांचे पुनर्वासन करावे यासाठी दहा दिवसात भारतीय दलित कोब्रा संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी नगरात झोपडपट्टी महापंचायतीचे आयोजन करण्यात येणार असून या पंचायती सर्वच या भूमिकेशी संबंधित नेत्यांना व झोपडपट्टीवासियांना यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. या झोपडपट्टी पंचायतीत सर्वानुमते निर्णय घेऊन पुढची रणनीती ठरविण्यात येणार आहे असेही ते म्हणाले. एका प्रश्नावर बोलताना ॲड. विवेक भाई चव्हाण म्हणाले महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या कर्ज प्रकरणास शासकीय हमी देण्यास तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक लहुराज माळी यांनी अक्षम दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेकडो प्रकरण तसेच पडून आहे त्यांनी एक प्रकारे दलित समाजावर अन्याय केला आहे. याशिवाय ट्रेनिंग सेंटरच्या नावाखाली त्यांनी मोठा गैरव्यवहार केला आहे. त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी होऊन त्यांना कायमचे सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली. या पत्रकार परिषदेला मराठवाडा अध्यक्ष अशोक बोर्डे, सागर बोर्डे, निलेश गायकवाड, सुमित्रा खंडारे, सुनीता चव्हाण, शांतीलाल गायकवाड, उषा वैष्णव, चंद्रकांत बोर्डे, विनोद गडकर, आशा पवार, पंचशीला अमराव, सुमित्रा लोखंडे, मनीषा दाभाडे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






