अनिल मकरिये यांची स्मार्ट सिटीला भेट, शहर विकासासाठी दिल्या सूचना...
स्थायी समिती अध्यक्ष अनिल मकरिये यांची स्मार्ट सिटीला भेट; शहर विकासासाठी दिल्या महत्त्वाच्या सूचना...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24 (डि-24 न्यूज)- महानगरपालिकेचे नवनियुक्त स्थायी समिती अध्यक्ष श्री. अनिल मकरिये यांनी मंगळवारी स्मार्ट सिटी कार्यालयाला भेट देऊन विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी स्मार्ट सिटीच्या टीमशी संवाद साधला आणि एकात्मिक कमांड आणि कंट्रोल सेंटरची (ICCC) बारकाईने पाहणी केली. या केंद्रांतर्गत शहरात बसवण्यात आलेल्या 1000 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या जाळ्याबाबत त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. विशेषतः 'ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन' कॅमेऱ्यांद्वारे चुकीच्या बाजूने वाहन चालवणे, सिग्नल तोडणे यांसारख्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनावर कशी नजर ठेवली जाते, याचे प्रात्यक्षिक त्यांनी पाहिले. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी स्मार्ट सिटी बसमध्ये बसवण्यात आलेले सीसीटीव्ही आणि वाहतूक नियमनासाठी उपयुक्त ठरणारी 'पब्लिक ॲड्रेस सिस्टम' पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. स्मार्ट सिटीच्या या आधुनिक सेटअपचे कौतुक करतानाच, याचा जास्तीत जास्त फायदा सामान्य नागरिक आणि प्रशासनाला कसा होईल, यावर अधिक भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी बोलताना श्री. मकरिये म्हणाले की, तंत्रज्ञानाचा वापर केवळ देखरेखीसाठी मर्यादित न ठेवता तो लोकहितासाठी अधिक प्रभावीपणे राबवला पाहिजे. शहरातील बेकायदा पार्किंग आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी 'पीए सिस्टम'चा वापर दिवसातून किमान दोनदा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा करावा, अशी सूचना त्यांनी केली. तसेच जुन्या बाजारपेठेतील अतिक्रमणे तातडीने हटवून तिथला आर्थिक व्यवहार आणि वाहतूक सुरळीत करण्यावर त्यांनी भर दिला. स्मार्ट सिटी बस सेवेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, महापालिकेचा उद्देश पैसा कमावणे नसून नागरिकांना उत्तम सुविधा देणे हा आहे, त्यामुळे ही सेवा अधिक कार्यक्षम आणि लोकभिमुख कशी करता येईल याकडे लक्ष द्यावे. त्यांनी स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणीसाठी स्मार्ट सिटीचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
या दौऱ्यात प्रकल्प व्यवस्थापक (IT) फैज अली यांनी त्यांना तांत्रिक बाबींची माहिती दिली. यावेळी उपायुक्त अपर्णा थेटे, सहाय्यक आयुक्त संजय चामले, स्मार्ट सिटीचे मुख्य वित्त अधिकारी उत्तम चव्हाण, लेखा अधिकारी अनिलदत्त कोथळीकर, मुख्य चालन व्यवस्थापक शहर बस संजय सुपेकर, मनपाचे जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
यापूर्वी त्यांनी मिटमिटा येथील प्राणिसंग्रहालय (झुऑलॉजिकल पार्क) प्रकल्पाचीही पाहणी केली होती व सर्व प्रकारच्या सहकार्यासाठी तयारी दर्शवली होती.
What's Your Reaction?