आंतरराष्ट्रीय योग दिवस जीवनशैली म्हणून "योगा"चा अंगिकार करावा - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
आंतरराष्ट्रीय योग दिवस
जीवनशैली म्हणून ‘योगा’चा अंगिकार करावा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि.21 (डि-24 न्यूज), उत्तम, संतुलित, निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास हा सर्वोत्तम मार्ग आहे. योगाचा दैनंदिनी म्हणून आपल्या जीवनात अंतर्भाव करावा. योगाचा जीवनशैली म्हणून अंगिकार व्हावा, अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी योगाचे महत्त्व सांगितले.
विभागीय क्रीडा संकूल येथे आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. खासदार डॉ. भागवत कराड, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, उदय कहाळेकर, योगप्रशिक्षक श्रीमती मोना राजपूत, उत्तम काळवणे आदी उपस्थित होते. कै. कलावती चव्हाण हायस्कूल, गीता हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. तसेच मान्यवरांसह उपस्थितांकडून योगाभ्यास करुन घेण्यात आला.
पतंजली योग समिती, जिल्हा योग संघटना यांनी या उपक्रमात सहभाग दिला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे सचिन पुरी, श्रीमती लता लोंढे, पुनम नवगिरे, दीपक जगदाळे, स्वप्निल तांगडे, अनिल दांडगे, सचिन बोर्डे यांनी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
बिबी का मकबरा येथे योग दिन साजरा...
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण तसेच इंडिया टुरिझम औरंगाबाद यांनी संयुक्तरित्या बिबी का मकबरा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन केले. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ च्या छत्रपती संभाजीनगर येथील अनुभवी योग प्रशिक्षकांनी ‘कॉमन योगा प्रोटोकॉल’नुसार ‘योग प्रात्यक्षिक’ आणि दैनंदिन जीवनातील योग आणि ध्यान यांची प्राथमिक माहिती उपस्थितांना देण्यात आली. भारत पर्यटनच्या सहाय्यक संचालक मालती दत्ता यांनी उपस्थितांना योग आणि पर्यटन याचे महत्त्व सांगितले. १३० हून अधिक साधक यात सहभागी झाले. इंडिया टुरिझम चे कर्मचारी; भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, केंद्रीय विद्यालयातील युवा टुरिझम क्लबचे विद्यार्थी; महाराष्ट्र सैनिक प्रबोधिनी शाळा; महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी; प्रादेशिक स्तरावरील पर्यटक मार्गदर्शक; पर्यटन भागधारक आणि पर्यटक आदींनी या उपक्रमात सहभाग घेतला.
बोटॅनिकल गार्डन, एन-8, सिडको येथे योग दिन साजरा...
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्यूरो व भारतीय योग संस्थान, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन बोटॅनिकल गार्डन, एन-८, सिडको येथे करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी खासदार डॉ. भागवत कराड, डॉ. कल्याणराव काळे, युवा उद्योजक अजिंक्य अतुल सावे, एमजीएम महागामी सांस्कृतिक संस्थेच्या पार्वती दत्ता, बँक ऑफ बडोदाचे प्रादेशिक प्रबंधक किशोर बाबू, उपप्रादेशिक प्रबंधक अतुल शिर्के, भारतीय योग संस्थेचे उपप्रांत प्रधान डॉ. उत्तम कळवणे, विभागीय प्रधान संजय औरंगाबादकर, विभागीय मंत्री आनंद अगरवाल, जिल्हा प्रधान भाऊ सुरडकर, वर्षा देशपांडे, कैलास जाधव, सुरेश शेळके, विद्या ताकसांडे, वैजनाथ डोमाळे, श्रीकांत पत्की आदी उपस्थित होते. योग मार्गदर्शन, योग प्रात्यक्षिक, योग प्रश्नमंजुषा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सूत्रसंचालन माधुरी चव्हाण तर आभार प्रदर्शन शिवाजी गायकवाड यांनी केले. भारतीय योग संस्थानच्या निर्मला कोकणे, विद्या कोकणे, विद्या राउत व सरस्वती गायकवाड यांनी साधकांकडून योग प्रात्यक्षिक करून घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केंद्रीय संचार ब्यूरो, छत्रपती संभाजीनगरचे प्रदीप पवार, प्रिती पवार, शरद सादिगले व भारतीय योग संस्थान, शाखा छत्रपती संभाजीनगरचे अधिकारी, पदाधिकारी व साधक यांनी परिश्रम
घेतले.
What's Your Reaction?