ओला दुष्काळ तात्काळ जाहिर करा, शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या - आमदार रोहीत पवार

"ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांसाठी मदत द्या – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी"
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज) – राज्यात अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, त्याच धर्तीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाने केली आहे.
जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात सापडले असून, त्यांच्या प्रश्नांबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले.
या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या –
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यास ओला दुष्काळग्रस्त घोषित करावे.
शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50 हजार रुपये मदत द्यावी.
शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी.
शैक्षणिक शुल्कमाफी तातडीने जाहीर करावी.
रस्ते, पूल व शाळांच्या खोल्यांची दुरुस्ती करावी.
शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे.
नुकसानीचे पंचनामे तातडीने करून नुकसानभरपाई वाटप करावे.
या मागण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष पाडुरंग तांगडे पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, कार्याध्यक्ष विश्वजीत चव्हाण, विद्यार्थी सेलचे सर्व पदाधिकारी, युवकचे सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ नेते व्दारकाभाऊ पाथ्रीकर, माजी आमदार किशोर पाटील, संजय वाघचौरे, महिला अध्यक्ष तथा सर्व पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट लढा देत राहील, असे आमदार रोहीत पवार यांनी यावेळी सांगितले. मागणी मान्य झाली नाही तर मराठवाड्यात भव्य मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
What's Your Reaction?






