आचार्य आर्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र शुभारंभ सोहळा, जिल्ह्यातील युवकांनी थेट प्रसारणाद्वारे अनुभवला
आचार्य आर्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र शुभारंभ सोहळा
जिल्ह्यातील युवक, युवतींनी थेट प्रसारणाद्वारे अनुभवला
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथून आचार्य आर्य चाणक्य कौशल विकास केंद्राच्या शुभारंभ कार्यक्रमाचे थेट प्रसारण आज जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून करण्यात आले. त्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना हा सोहळा अनुभवता आला.
जिल्ह्यातील 33 महाविद्यालयांमध्ये आचार्य आर्य चाणक्य कौशल विकास केंद्राची स्थापना करण्यात आली. आज या सर्व महाविद्यालयांमध्ये वर्धा येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या मुख्य उद्घाटन सोहळ्याच्या थेट प्रसारण पाहून त्यात सहभागी होण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
शहरातील कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या सभागृहात आयोजित जिल्ह्यातील मुख्य कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सुरेश वराडे, शाहू महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रंजीत मुळे, प्रशासन अधिकारी श्रीकांत देशमुख, प्राचार्य उल्हास शिंदे शाहू महाराज शिक्षण संस्थेतील प्राध्यापक, विभाग प्रमुख विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, शिक्षणाद्वारे मिळालेल्या कौशल्याचा उपयोग युवकांनी देशाचा विकास करण्यासाठी करावा. यासाठी शाळा महाविद्यालयातील युवक युवतींसाठी ‘युवा संवाद व व्यक्तिमत्व विकास’ कार्यक्रमाचे आयोजन जिल्ह्यात प्रशासनाने केले आहे. शासन आणि प्रशासन कौशल्य विकास बरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत आहे.
अपर जिल्हाधिकारी डॉ. लोखंडे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विविध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी भावी पिढीवर असल्याने चौकटी बाहेर सृजनात्मक विचार करून मानवी जीवन सुसह्य आणि सुकर करण्यासाठी जे काही संशोधन आणि कौशल्य आत्मसात करता येतील ते करावेत. या कार्यक्रमात विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक सहभागी झाले होते.
प्रवेश नोंदविण्याचे आवाहन
या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयवर्षे 18 ते 45 वयोगटातील इच्छुक युवक-युवतींनी संबंधित महविद्यालयांमध्ये रोजगार/स्वयंरोजगाराभिमुख अभ्यासक्रमांच्या कौशल्य विकास प्रशिक्षणाकरिता आपला प्रवेश नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
40 अभ्यासक्रमांचा समावेश
या योजनेअंतर्गत कृषी क्षेत्रातील हायड्रोफोनिक टेकनिशियन, किसान ड्रोन ऑपरेटर, ऑटोमोटीव क्षेत्रातील इलेक्ट्रिक व्हेइकल संबधी अभ्यासक्रम, जीएसटी असिस्टंट, सोलार पॅनल टेक्निशियन, हेल्थकेअर क्षेत्रातील जनरल ड्यूटी असिस्टंट, आयटी क्षेत्रातील वेब डेवलपर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, सिक्युरिटी गार्ड, अकाऊंट असिस्टंट आणि इलेक्ट्रिशियन इ. एकूण 40 अभ्यासक्रमामध्ये रोजगार/स्वयंरोजगाराभिमुख अभ्यासक्रमांमध्ये मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
What's Your Reaction?