भाजपला मोदींचा चेहरा जड झालाय त्यांना गुजरातला पाठवा - उध्दव ठाकरे यांचा घणाघात

 0
भाजपला मोदींचा चेहरा जड झालाय त्यांना गुजरातला पाठवा - उध्दव ठाकरे यांचा घणाघात

भाजपला मोदींचा चेहरा जड झालाय त्यांना गुजरातला पाठवा - उध्दव ठाकरे यांचा घणाघात

औरंगाबाद, दि.10(डि-24 न्यूज) भाजपा आमच्यावर टिका करते परंतु तुमच्याकडे चेहरे आहेत. सगळे आता इंडिया आघाडीत पंतप्रधान पदाचे सर्व दावेदार सांगत आहेत मात्र भाजपला एकच चेहरा जड झाला आहे. त्यामुळे त्यांनी आता नवीन चेहरा कोण ते शोधावे. त्यांच्याकडे आता चेहराही नाही. जो व्यक्ती देशाला खड्ड्यात घालायला चालला अशा व्यक्तीला पुन्हा पंतप्रधान करायचे आहे का...? म्हणून त्यांना गुजरातला पाठवा असा घणाघात सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या जाहीर सभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले मोदींचे इंजिनच बदलायचे आहे. त्यांना पुन्हा गुजरातला पाठवा दहा वर्षे हे इंजिन केवळ वाफा नाही तर थापा मारत आहे. मोदी मला संपवायला निघाले होते आता त्यांची हवा निघाली आहे. औरंगाबादचे नाव मी संभाजीनगर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री असताना घेतला यांनी आतापर्यंत विमानतळाला छत्रपती संभाजीराजेंचे नाव देता आले नाही. मुख्यमंत्री असताना समांतर जलवाहिनीसाठी पैसे दिले आता पाण्याचा प्रश्न गंभीर आहे मराठवाडा सुध्दा दुष्काळाच्या छायेत आहे. आतापर्यंत जलवाहिनीचे काम हे पूर्ण करु शकले नाही. पाणी प्रश्न सुटला का असा प्रश्न उपस्थित जनतेला ठाकरेंनी विचारला.

शरद पवार साहेबांना यांना भटकती आत्मा म्हणतात मला नकली शिवसेना म्हणतात. परंतु या तान्हेल्या आत्म्याचे प्रश्न तुम्ही सोडवले का...? तुम्हीच माझा बाप आणि चिन्ह चोरले. हे पाप मोदींनी केले. आमचं हिंदूत्व हे घरातील चूल पेटवणारे आहे तर भाजपचे हिंदूत्व घर पेटवणारे आहे. तुमच्या आणि आमच्या हिंदुत्वात मोठा फरक आहे. यांच्यामुळे अनेक जण जखमी होत आहे. आणि ते म्हणतात एक अकेला सबपे भारी. यांना जनतेशी काही देणेघेणे नाही. सर्व उद्योग गुजरातला पळवले. माझा आकस गुजरातवर नाही तोही भारतातच आहे. परंतु उद्योग तिकडे नेऊन महाराष्ट्राला बकाल करु नका. गुजरातची कांदा निर्यातबंदी उठवली जाते महाराष्ट्राची नाही. मोदींनी मला डोळा मारला. मला जनतेशी बांधिलकी आहे मी कधीही जनतेला सोडून भाजपा सोबत जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. 

गद्दारी विकत घेता येते निष्ठा ही रक्तात असते. आमच्या रक्तात हीच निष्ठा आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान आम्ही पाळायचे हेच भाजपा वाल्यांना पटत नाही त्यासाठीचा हा लढा आहे. त्यासाठीच ही आई जगदंबेची मशाल आमच्या हातात दिली आहे म्हणून चंद्रकांत खैरे व डॉ.कल्याण काळे यांना बहुमताने विजयी करा असे आवाहन ठाकरे यांनी जाहीर सभेत केले. मोदींनी 2014 साली पंतप्रधान व्हावे यासाठी माझी सही घेतली होती आणि आता आम्हाला नकली शिवसेना व मला नकली संतान म्हणाले. तुम्ही तुमचा आत्मा संताणाला विकला का जसा आदानींना विकला तसा विकला का असा सवाल मोदींना ठाकरेंनी विचारला.

मोदींनी त्यांच्या पाव उपमुख्यमंत्री पाय रोवून माझ्यासोबत गद्दारी केली आहे. तुम्ही चांगले चाललेले महाविकास आघाडीचे सरकार पाडले. बाळासाहेबांचा आशिर्वाद असता तर तुम्हाला मुंबईत गुढघे टेकवावे लागले नसते. तुम्हाला आमचा महाराष्ट्र रस्त्यावर उतरल्या शिवाय सोडणार नाही. जसे मोदींनी नोटबंदी केली तशी चार जूननंतर महाराष्ट्राची नाणेबंदी करणार. 4 जूननंतर मोदींचे नाणे बंद होणार. गद्दारांना सोबत घेऊन माझे धणूष्यबाण कलंकित केले. माझे धणूष्यबाण पेलण्याची धमक तुमच्यात आहे का...? तुम्हाला माझ्या वडीलांचे नाव लावावे लागते तुमच्या वडीलांचे नाव लावा ना...असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता टिका केली. निवडणूक आयोगावर दबाव आणून गद्दारांना शिवसेना दिली. आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो तेथेही मोदी दबाव आणत असल्याचा आरोप ठाकरेंनी लावला. सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय घ्यावा मोदी सांगत आहेत.

केजरीवालांचे अधिकार मोदींनी काढून घेतले सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे अधिकार बहाल केले मग मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय का घेतला नाही. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी शांततेत आंदोलन करत होते. ते आंदोलन चिरडण्यासाठी गोळीबार करण्यात आला. तो गोळीबार जनता विसरलेली नाही. जेव्हा हि घटना घडली मी जरांगेंना भेटायला गेलो. त्यावेळी पोलीसही भयभीत झाले होते. लाठ्याकाठ्या खाल्लेल्या लोकांनी मी गेल्यावर जयघोष केला. त्यांना वाटले कोणीतरी आधार द्यायला आला. तुम्ही या मराठा बांधवांवर जो अत्याचार केला कोणाच्या आदेशाने गोळीबार केला...? तुम्ही फसवणूक करता आणि नंतर आरक्षणाच्या गोष्टी करतात असा प्रश्न ठाकरेंनी विचारला.

आज अवकाळी पाऊस सुरू झाल्याने हेलिकॉप्टरचा प्रश्न निर्माण झाल्याने जालना येथे आयोजित जाहीर सभेसाठी आलो नसल्याने ठाकरेंनी जालनेकरांशी माफी मागितली. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

व्यासपीठावर राज्यसभेचे सदस्य चंद्रकांत हांडोरे, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, आमदार उदयसिंह राजपूत, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत खैरे, जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ.कल्याण काळे, काँग्रेसचे नेते अनिल पटेल, शहराध्यक्ष युसुफ शेख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, इलियास किरमानी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, डॉ.शोएब हाश्मी, नवीनसिंग ओबेरॉय आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow