मतदार जनजागृतीसाठी महिलांनी पुढाकार घ्यावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
मतदार जनजागृतीसाठी महिलांनी घ्यावा पुढाकार-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
औरंगाबाद,दि.11(डि-24 न्यूज) मतदान हा लोकशाहीचा उत्सव आहे. मतदानाचा हक्क बजावून प्रत्येक भारतीय नागरिकाने साजरा करावा. मतदारांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी महिलांचा महत्वपूर्ण सहभाग असून त्यांनी मतदार जनजागृतीत पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले.
जागतिक महिला दिन (दि.८) चे औचित्य साधून आज जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शासकीय विभागातील महिला अधिकारी, कर्मचारी महिला पत्रकार यांचा सन्मान व मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी अर्चना खेतमाळीस, सुचिता शिंदे, नीलम बाफना, श्रीमती मुथा, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्यासह विविध विभागातील महिला अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की भारताची लोकशाही प्रगल्भ आहे. लोकशाहीचे महत्त्व टिकविण्यासाठी मतदानाचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. मतदाराने आपले कर्तव्य व जबादारीपासून दूर जावू नये. मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी महिलांचे योगदान महत्वपूर्ण आहे. आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी लोकांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन श्री. स्वामी यांनी केले.
ते म्हणाले की, मतदान केंद्रावर सर्व सुविधा उलब्ध करून देण्यात येणार आहेत. महिला मतदार, लहान मुलांची काळजी घेण्यासाठी मतदार सहायता केंद्र याची उपलब्धता करून देण्याचा येणार आहे. महिला सक्षम आहेत,वेदकालापासून महिला थोर आहेत. सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, गार्गी, मैत्रेयी या अतिशय विद्वान महिलांनी आपला वारसा समृद्ध केला आहे. त्यांच्या कार्याचा आणि विचाराचा वारसा घेवून अनेक महिला विविध क्षेत्रात काम करीत आहेत. महिला सक्षम आणि आत्मविश्वास पूर्ण असतात. कठीण परिस्थितीत धेर्याने सामोरे कसे जावे याबाबत त्यांच्यात क्षमताविकसित झालेल्या असतात. मतदानाचा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला जावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविक अर्चना खेतमाळीस यांनी तर सुत्रसंचलन नीता पानसरे यांनी केले. जिल्हाधिकारी स्वामी यांनी निवडणुक आयोगाने मतदारांसाठी तयार केलेली शपथ उपस्थित सर्व महिलांना दिली
.
What's Your Reaction?