आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी परीक्षा केंद्रावर...!

इयत्ता १२ वी परीक्षा; जिल्हाधिकाऱ्यांनी केली...
परीक्षा केंद्रावरील सोई सुविधांची पाहणी...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.11(डि-24 न्यूज)- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२वी) आजपासून सुरु झाल्या. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सकाळी प्रत्यक्ष परीक्षा केंद्राची पाहणी करुन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सोई सुविधांची पाहणी केली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता १२ वी च्या परीक्षांना आजपासून सुरुवात झाली. इयत्ता १२ वी ची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या दरम्यान होणार आहेत. जिल्ह्यात इयत्ता १२ वी ची परीक्षा ६३ हजार ९७८ विद्यार्थी देत असून १६१ केंद्रांवर या परीक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे.
तालुकानिहाय केंद्र व्यवस्था याप्रमाणे- छत्रपती संभाजीनगर ग्रामिण- २० केंद्र ८०८६ विद्यार्थी, छत्रपतीसंभाजीनगर शहर-३३ केंद्र १४ हजार २५५ विद्यार्थी, गंगापूर १४ केंद्र, ६४०० विद्यार्थी, कन्नड १९ केंद्र ६०१२ विद्यार्थी, खुलताबाद १२ केंद्र, ४६२५ विद्यार्थी, पैठण-१६ केंद्र, ५८०२ विद्यार्थी, सिल्लोड-१७ केंद्र ६०५३ विद्यार्थी, सोयगाव-८ केंद्र, ३११४ विद्यार्थी, वैजापूर ११ केंद्र, ५३०१ विद्यार्थी फुलंब्री ११ केंद्र ४३३० विद्यार्थी.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सकाळी देवगिरी महाविद्यालयातील परीक्षा केंद्रास भेट देऊन पाहणी केली. या परीक्षा केंद्रावर सर्वाधिक २८०० विद्यार्थ्यांच्या परीक्षेची सोय करण्यात आली आहे. येथील परीक्षा केंद्र, तेथील शांतता, विद्यार्थ्यांची दप्तरे, पादत्राणे ठेवण्याची सोय, पिण्याचे पाणी, आसन व्यवस्था, वर्गखोल्यांमधील प्रकाश, हवा इ. सुविधांबाबत पाहणी केली. परीक्षा केंद्राबाहेरील पोलीस बंदोबस्ताचाही यावेळी आढावा घेण्यात आला. वाढत्या तापमानाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ नये यासाठी प्रतिक्षा कालावधीसाठी सावलीची व्यवस्था, वाहन तळ अशा विविध सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी स्वामी यांनी केली. परीक्षा केंद्रावर नियुक्त केंद्राधिकारी व अन्य सहकाऱ्यांशी चर्चा केली.
परीक्षा केंद्र परिसरात मनाई आदेश...
परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्र परिसरात व त्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी परीक्षा केंद्र परिसराच्या १०० मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी मनाई आदेश जारी केले आहेत. त्यानुसार परीक्षा केंद्र व त्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात परीक्षार्थी, परीक्षेसाठी नेमलेले कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी वगळून अन्य कुणाही व्यक्तिस प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र परिसरात पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तिंना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. १०० मीटर परिसरात झेरॉक्स दुकाने सुरु ठेवण्यास, सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी बुथ, आयएसडी बुथ, फॅक्स केंद्र, मोबाईल, वायरलेस सेट, ट्रान्झिस्टर, रेडीओ, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप इ. जवळ बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. हे आदेश दि.११ फेब्रुवारी ते दि.१८ मार्च या कालावधीत अंमलात राहतील असे कळविण्यात आले आहे.
भरारी पथके नियुक्त...
या परीक्षा कालावधीत जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त वर्ग १ अधिकाऱ्यांची भरारी पथके नियुक्त करण्याचे आदेशही अपर जिल्हा दंडाधिकारी यांनी निर्गमित केले आहेत. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात तहसिलदारांच्या नेतृत्वात भरारी पथके नियुक्त करण्यात आले आहेत. एका पथका किमान चार सदस्य असतील व एक सदस्य महिला असेल. त्याच प्रमाणे प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक बैठे पथकही नियुक्त असेल व त्यातही एक सदस्य महिला असेल. परीक्षा सुरळीत होण्याच्या दृष्टीने या पथकांनी कारवाई करावी,असे निर्देश देण्यात आले आहेत
.
What's Your Reaction?






