आमदार बोरनारेंचा राजीनामा तर वरपुडकरांचा मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणासाठी, लक्ष्मण पवार यांचाही राजीनामा
आत्ताची मोठी बातमी... मराठा आरक्षणासाठी आमदार बोरनारेंचा राजीनामा
सुरेश वरपुडकर यांचा मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणासाठी राजीनामा दिल्याने खळबळ...
औरंगाबाद, दि.31(डि-24 न्यूज) राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र होत असताना मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाचे वैजापूरचे आमदार प्रा.रमेश बोरनारेंनी मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देत आपल्या आमदार पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे तर ठिकठिकाणी नेत्यांच्या गाड्या अडवून जाब विचारला जात आहे. सर्व समाजाकडून मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. आंदोलनात मुस्लिम व दलित समाज सुध्दा उतरला आहे. अशा परिस्थितीत बोरनारेंच्या राजीनाम्यामुळे शिंदे गटाचे टेन्शन वाढले आहे. आणखी काही लोकप्रतिनिधी राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. बोरनारे यांनी विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांच्याकडे राजीनामा पत्र दिल्याची माहिती डि-24 न्यूजला मिळाली आहे. यापूर्वी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिल्याने हा शिंदे गटाला दुसरा मोठा धक्का मानला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मतदार संघाचे बोरनारे हे आमदार आहेत. बीडचे गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनीही आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे दिला आहे. या विषयावर समाजाच्या भावना आरक्षणासाठी माझा पाठिंबा आहे. मराठा आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे असे भाजपाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. काँग्रेसचे परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील आमदार सुरेश वरपुडकर यांनी आपल्या राजीनामा पत्रात मराठा, धनगर व मुस्लिम आरक्षणासाठी आमदार पदाचा राजीनामा दिला असल्याचे नार्वेकर यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. आणखी अनेक आमदार व खासदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
What's Your Reaction?