उध्दव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर...! साधला शेतकऱ्यांशी संवाद

 0
उध्दव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर...! साधला शेतकऱ्यांशी संवाद

पक्षप्रमुख उध्दव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर...

शेतकरी बांधवांसोबत साधला संवाद

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.7(डि-24 न्यूज) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तालुक्यातील निपाणी गावातील विष्णू रामविलास लाहोटी यांच्या शेत बांधावर जाऊन शेतकरी बांधव व महिलांसोबत संवाद साधला. पेरणी झाल्याच्या एक महिन्यानंतर पाऊस नसल्याने करपत असलेल्या शेतमालांची यावेळी त्यांनी पाहणी केली. 

बी - बियाणे, रासायनिक खते यांच्या दराची माहिती घेऊन वाढलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाची माहिती घेतली. राज्य सरकार फसव्या घोषणा करत असुन त्यांचा लाभ स्थानिक पातळीवर आम्हाला मिळत नसल्याची खंत यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली. 

उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात झालेल्या कर्जमाफीचा आम्हाला फायदा मिळाला आहे. दोन लाखापर्यंत झालेली ही कर्जमाफी सर्वापर्यंत पोहोचली. परंतु त्यानंतर आलेले महायुतीचे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असून पिक विमा, शेतकरी अनुदान व दुष्काळ अनुदान आलेले नसल्याची कबुली यावेळी शेतकऱ्यांनी दिली.

रोजंदारीने शेतात कामासाठी आलेल्या एका महिलेसोबत शाळकरी मुलगा आलेला होता. त्यांच्याशी संवाद साधत हा मुलगा शाळेत का जात नाही याची ठाकरे यांनी विचारपूस केली. आर्थिक हलाखिमुळे प्रवेश घेता येत नसल्याची माहिती या महिलेने दिली. शिवसेना या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी त्या महिलेला दिला.

याप्रसंगी शिवसेना नेते विनायक राऊत, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, सचिव मिलिंद नार्वेकर, उपजिल्हाप्रमुख अशोक शिंदे, तालुकाप्रमुख आनंद भालेकर व मनोज पेरे उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow