औरंगपुरा भाजी मंडईचा वनवास 14 वर्षांनंतर संपला, आज मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते लोकार्पण झाले...
औरंगपुरा भाजी मंडईचा 14 वर्षांनंतर वनवास संपला, आज मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) - औरंगपुरा(संभाजी पेठ) येथील सावित्रीबाई फुले भाजी मंडईचा लोकार्पण सोहळा आज मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. बीओटी तत्त्वावर मंडइचे काम पूर्ण करण्यासाठी अनेक विवादानंतर 14 वर्षांचा काळ लोटला. सन 2011 साली या भाजी मंडईची इमारत पाडून बीओटी तत्त्वावर विकसित करण्यासाठी महापालिकेने दिली होती. या भाजी मंडईत 35 गाळे तर 140 ओटे बांधण्यात आले. लोकार्पण सोहळ्यात अनेक विघ्ने येत होती ती दूर करण्यात स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांना यश आल्यानंतर आज भर पावसात उशिरा का होईना लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम झाला व भाजी खरेदी करणा-या ग्राहकांना व भाजी विक्रेत्यांना दिलासा मिळाला.
या भाजी मंडईचा इतिहास बघितला असता हि मंडइ सन 1977 साली सुरू करण्यात आली होती. हि इमारत जुनी झाल्याने बीओटी तत्त्वावर विकसित झाल्यानंतर जुन्या भाजीपाला विक्रेत्यांना याच ठिकाणी जागा देण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी अनेक वर्षे अनेकांनी संघर्ष केला. पण 140 पैकी 48 जणच मूळ ओटेधारक समोर आले आहे. 20 गाळे आणि उर्वरित ओटे वाटपाचा निर्णय महापालिकेला घ्यावा लागणार आहे. याठिकाणी प्रशस्त सभागृह बांधण्यात आला आहे. आज झालेल्या लोकार्पण सोहळ्याने भाजी विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सावित्रीबाई फुले भाजीमंडई संकुलाचे लोकार्पण
स्वच्छ भाजी मंडई ठेवण्याचे सर्वांचे कर्तव्य-
मंत्री अतुल सावे
भाजी मंडई बाहेर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही
महापौर यांचे स्पष्ट निर्देश...
महानगरपालिकेच्या विद्यमाने बीओटी (BOT) तत्त्वावर विकसित करण्यात आलेल्या या"सावित्रीबाई फुले भाजीमंडई संकुल, संभाजीपेठ" या आधुनिक प्रकल्पाचे आज राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर समीर राजूरकर होते.
विधानसभेचे सदस्य प्रदीप जैस्वाल, माजी केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, विरोधी पक्ष नेता समीर साजिद ,सभागृह नेते गोविंद केंद्रे, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती जालिंदर शेंडगे, नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल, नगरसेवक सचिन खैरे, शिवाजी दांडगे, राजगौरव वानखेडे, नगरसेविका कीर्ती शिंदे, अमृता पालोदकर, नगरसेविका तरन्नुम अखिल अहमद, नगरसेविका नूर जहान इकबाल, आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, उप आयुक्त अपर्णा थेटे, उप अभियंता संजय चामले पात्र लाभार्थी ,नागरिक तसेच यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दीप प्रज्वलन करण्यात येऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
लोकार्पणानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात एकूण सहा ओटे धारक भाजी विक्रेत्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रकल्पामुळे व्यापाऱ्यांना सुरक्षित, सुसज्ज व व्यवस्थित व्यवसायाचे वातावरण उपलब्ध होणार असून नागरिकांनाही अधिक दर्जेदार सुविधा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना
मंत्री अतुल सावे म्हणाले की,
"छत्रपती संभाजी नगरच्या विकासात अशा आधुनिक सुविधा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. व्यापाऱ्यांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि नागरिकांना स्वच्छ व नियोजनबद्ध बाजारपेठ देणे ही शासनाची प्राथमिकता आहे. तसेच ही भाजी मंडई स्वच्छ ठेवण्याचे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. महानगरपालिकेच्या इतर ठिकाणी खुल्या जागा असतील त्या ठिकाणी सुद्धा भाजी मंडई विकसित करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच त्यांनी सभापती अनिल मकरिये यांचे विशेष कौतुक केले. त्यांच्या विशेष पुढाकारातून ही भाजी मंडई पुन्हा 14 वर्षानंतर नव्या रूपात सुरू होत आहे. असे ते म्हणाले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना महापौर समीर राजूरकर म्हणाले की
"महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात आधुनिक सुविधा निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. ही भाजी मंडई व्यापारी आणि ग्राहक या दोघांसाठीही आदर्श बाजारपेठ ठरेल."तसेच भाजी मंडई बाहेर या पुढे कोणतेही अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही याची मनपा प्रशासनाने दक्षता घ्यावी असे ते म्हणाले.
उपमहापौर राजेंद्र जंजाळ म्हणाले की,
"महानगरपालिकेने नागरिकांच्या सोयीला प्राधान्य देत हा प्रकल्प पूर्ण केला आहे. भविष्यातही अशाच लोकाभिमुख विकासकामांना गती दिली जाईल."
तसेच यावेळी स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, 14 वर्षांनंतर ही भाजी मंडई सुरू होत आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सावित्रीबाई फुले भाजी मंडई याचे लोकार्पण होत आहे. या सारखा सुवर्ण दिवस नाही. महापौर, उप महापौर, आयुक्त यांचे मी विशेष आभार मानतो.त्यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. मी यासाठी वेळोवेळी आढावा घेतला. बैठका घेतल्या. भाजी विक्रेत्यांची समजूत काढली.यामुळे ही भाजी मंडई पुन्हा नव्या रूपात सुरू होत आहे.या मूळ भाजी विक्रेत्यांना हक्काचे ओटे व गाळे मिळणार आहे.
आपले प्रास्ताविक करताना आयुक्त अमोल येडगे म्हणाले की
"सावित्रीबाई फुले भाजीमंडई संकुल हे आधुनिक नियोजन, सुविधा आणि व्यवस्थापन यांचा उत्कृष्ट संगम आहे. नागरिक व व्यापाऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील राहील."
यावेळी भाजी विक्रेते यांच्या वतीने शशिकला खोबरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमांचे सूत्र संचालन प्रशासन अधिकारी संजीव सो
नार यांनी केले.
What's Your Reaction?