कच-याच्या कंपनीला एमआयएमच्या नगरसेविकेने मोटाभाई म्हटल्याने खडाजंगी...!

 0
कच-याच्या कंपनीला एमआयएमच्या नगरसेविकेने मोटाभाई म्हटल्याने खडाजंगी...!

कच-याच्या कंपनीला एमआयएमच्या नगरसेविकेने "मोटाभाई" म्हटल्याने खडाजंगी...

बिमारी काय एकदाचा सोक्षमोक्ष लावा, नगरसेविका अदवंत भडकल्या...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज) हडको एन-12 केंद्राचा मुद्दा उपस्थित करत, कचरा संकलनाचे काम दिलेल्या कंपनीचा उल्लेख एमआयएमच्या नगरसेविका श्रीमती अलमास खानम अमजद चाचू यांनी स्थायी समितीच्या बैठकीत गुजरातच्या कचरा संकलन कंपनीला "मोटाभाईची कंपनी" असा केला. दोन-तीनदा हाच उल्लेख केल्याने, सभापती मकरिये यांच्यासह नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी त्यावर आक्षेप घेतला, कंपनीचे नाव घ्या, अशी मागणी केली. तर 'मोटाभाई' हा गुजरातीतील कॉमन वर्ड असल्याचे एमआयएम नगरसेवकांनी सांगत सारवासारव केली.

एमआयएमचे नगरसेवकांकडून एन-12 येथील कचरा संकलन केंद्रामुळे नागरीकांच्या आरोग्याचा विषय काढून चर्चा केली जाते. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सुध्दा हा विषय काढला असता सत्ताधारी भाजपाच्या नगरसेविका अॅड माधुरी अदवंत भडकल्या त्यांनी नेहमी बिमारीचा विषय काढतात यांची बिमारी काय याचा एकदाचा खुलासा झाला पाहिजे अशा शब्दांत एमआयएमच्या नगरसेवकांना फटकारले.

बहुचर्चित हडकोतील एन-12 कचरा संकलन केंद्राला मागील काही दिवसांपासून एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील, विरोधी पक्षनेता अब्दुल समीर साजिद यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. या संकलन व प्रक्रिया केंद्रावर कचरा येऊ देणार नाही असा पवित्रा घेत इतर ठिकाणी हे कचरा संकलन केंद्र हलवण्याची मागणी केली आहे. एमआयएमचे नगरसेवकही हा मुद्दा वारंवार उपस्थित करत आहेत. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतही एमआयएमचे स्थायी समिती सदस्यांनी हा मुद्दा चर्चेला आणला. यामुळे राजकीय वातावरण तापले व खडाजंगी झाली. त्यावर वंचितचे नगरसेवक अमित भुईगळ यांनी हा प्रश्न माझ्या प्रभागातील असून, नागरिकांच्या तक्रारी नाहीत. आम्ही 4 नगरसेवक आहोत, काही अडचणी असतील, तर नागरिक आम्हांला नक्कीच सांगतील. त्याचा विचार तुम्ही करू नका, असा टोला लगावला. सन 2018 पासून हा कचरा डेपो तिथे कार्यरत असून, तेव्हा का विरोध केला नाही, आत्ताच का विरोध केला जात आहे, असा सवालही भुईगळ यांनी उपस्थित केला. तर आम्ही आमचा वेळ खर्च करून या बैठकांना येतो, इथे आल्यावर अशा गोष्टी चर्चा होतात, त्या ऐकायला आम्ही येत नाही. वादाचा मुद्दा काढून सभागृहाचा वेळ वाया घालवतात. हे चालणार नाही. त्यांनी विकास कामांवर बोलावे.,असे ॲड. अदवंत यांनी सुनावले. सचिव नंदकिशोर भोंबे यांनी कचरा संकलन केंद्रावरील प्रक्रिया पुन्हा एकदा नगरसेवकांसमोर सादर केली. या केंद्रावर कशा पद्धतीने कामकाज चालते, याची सविस्तर माहिती दिली. 

कचरा उचलणे, विकासाचे काम नाही का...? - सभापती अनिल मकरिये 

कचरा संकलन व वाहतूकीचे काम महापालिकेने कंपनीला दिलेले आहे. कचरा उचलणे हे विकासाचेच काम आहे, तुमच्या भागातील कचरा उचलायचा नाही का...?, तसे सांगा, उद्यापासून कचरा उचलणे बंद करावा का, असा सवाल सभापती अनिल मकरिये यांनी उपस्थित करत, एमआयएम नगरसेवकांचे कान उपटले.

नगरसेवकांना समान निधी मिळावा - नगरसेवक अजहर पठाण 

सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्षाचे नगरसेवक नीधी वाटपात भेदभाव न करता समान निधी मिळावा. नागरीक कर भारतात तोच पैसा नीधीच्या स्वरूपात दिला जातो कोणाच्या खिशातून दिला जात नाही तर समान न्याय सभापती यांनी करावा अशी मागणी एमआयएमचे नगरसेवक अजहर पठाण यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow