ग्रामिण पोलिसांनी 10 तलवारीसह इसमास केली अटक...

 0
ग्रामिण पोलिसांनी 10 तलवारीसह इसमास केली अटक...

विनापरवाना धारदार शस्त्र बाळगणाऱ्या इसमाला पोलिसांनी केली अटक; 10 तलवारीसह 20 हजारांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि 5(डि-24 न्यूज) :– जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत विनापरवाना धारदार शस्त्र बाळगणाऱ्या एका इसमाला अटक केली असून त्याच्याकडून 10 लोखंडी तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.

दिनांक 03 जून 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौजे शेवगा येथील समृद्धी महामार्गालगत विजय किसन सुलाने यांच्या शेतात एक इसम विनापरवाना धारदार शस्त्रे घेऊन थांबलेला आहे. सदर माहितीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक सतीष वाघ यांच्या सूचनेनुसार विशेष पथक तयार करण्यात आले.

सदर पथकाने दिनांक 04 जून 2025 रोजी रात्री 12.45 वाजता अचानक छापा टाकून विक्की उर्फ उदयसिंग विजयसिंग बहुरे (वय 23, रा. पमावती नगर, जालना) याला ताब्यात घेतले. त्याच्या जवळील दोन पांढऱ्या रंगाच्या गोण्यांची तपासणी केली असता त्यामध्ये धारदार लोखंडी 10 तलवारी आढळून आल्या. या तलवारींची एकूण किंमत सुमारे 20,000 रुपये इतकी आहे.

या प्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा 1959 चे कलम 4/25 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीष वाघ, सपोनि पवन इंगळे, स.फौ. लहु थोटे, पो.ह. श्रीमंत भालेराव, पो.ह. कासीम शेख, पो.ना. विजय धुमाळ व चालक पो.अ. शिवाजी मगर यांच्या पथकाने केली.

अवैध शस्त्र साठ्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; परिसरात खळबळ

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow