जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने केली निदर्शने...

 0
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने केली निदर्शने...

भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज) - भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा यांच्या देशव्यापी टप्प्याटप्प्याने सुरू असलेल्या आंदोलनाचा तिसरा टप्पा शहरात जोरदार निदर्शनांनी गाजला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमून प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करत विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली.

 मागण्यांवर ठाम भूमिका – “आता नाही तर कधीच नाही!”

या आंदोलनामागील प्रमुख मुद्दे अत्यंत गंभीर असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

 ओबीसी जातनिहाय जनगणना:

केंद्र शासनाने जातनिहाय जनगणनेची घोषणा करूनही प्रत्यक्ष अधिसूचनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम न देणे, ही सरळसरळ फसवणूक असल्याचा आरोप करण्यात आला. “अचूक आकडेवारीशिवाय सामाजिक न्याय अशक्य आहे. ओबीसींची खरी लोकसंख्या आणि त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती समोर येणे आवश्यक आहे,” असे आंदोलनकर्त्यांनी ठणकावले.

UGC इक्विटी रेग्युलेशन कडक करा:

उच्च शिक्षण संस्थांमध्ये वाढत चाललेल्या जातीय भेदभावावर कठोर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक नियमांची गरज असल्याचे सांगण्यात आले. रोहित वेमुला आणि पायल तडवी यांसारख्या घटनांचा उल्लेख करत, “विद्यार्थ्यांना न्याय मिळत नसेल तर शिक्षण व्यवस्थेचा काय उपयोग...?” असा सवाल उपस्थित करण्यात आला.

 TET पासून सूट – जुन्या शिक्षकांना न्याय द्या:

2011 पूर्वी नियुक्त शिक्षकांनी अनेक वर्षे सेवा दिल्यानंतरही त्यांना TET सक्ती करणे अन्यायकारक असल्याचे सांगण्यात आले. “ज्यांनी आयुष्य घालवून विद्यार्थ्यांना घडवले, त्यांच्यावर अन्याय होऊ नये,” अशी भूमिका मांडण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन – प्रशासनाला थेट इशारा

या सर्व मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले की, जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.

23 एप्रिलला ‘भारत बंद’ – संभाजीनगरही ठप्प होणार!

निवेदनाद्वारे प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या की, 23 एप्रिल 2026 रोजी देशव्यापी ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर शहरातही पूर्ण बंद पाळण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

“हा केवळ इशारा नाही, तर हक्कांसाठीची निर्णायक लढाई आहे,” असा निर्धार व्यक्त करण्यात आला.

राष्ट्रीय पातळीवर सुरू असलेले सदरचे आंदोलन हे भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम आणि राष्ट्रीय पीछडावर्ग  मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल यांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे.

या निदर्शनावेळी बहुजन मुक्ती पार्टी युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दीपक शिंदे, बामसेफचे वरिष्ठ पदाधिकारी हिम्मतराव सावंग, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष साळवे, तसेच अरुण कुमार लहू पंचांग, प्रदेश उपाध्यक्ष अलीयार खान, सुरेश वाघमारे, राहुल सोनुले, संतोष भगत, राहुल इंगोले, काकासाहेब शेजुळ आणि रियाज देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

 “लढा सुरूच राहणार” – सरकारला थेट आव्हान

आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “सामाजिक न्याय, आरक्षण आणि बहुजन हक्कांसाठीचा हा लढा थांबणार नाही. सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर रस्त्यावरचा संघर्ष

अधिक तीव्र केला जाईल.”

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow