टॅक्सीचालक शहराचे ब्रँड अँबेसेडर, त्यांची वागणूक ही तशीच हवी- मनपा आयुक्त जी श्रीकांत

 0
टॅक्सीचालक शहराचे ब्रँड अँबेसेडर, त्यांची वागणूक ही तशीच हवी- मनपा आयुक्त जी श्रीकांत

टॅक्सीचालक शहराचे ब्रँड अँबॅसेडर, त्यांची वागणूकही तशीच हवी...

-आयुक्त जी श्रीकांत यांचा शहरातील टॅक्सीचालक, मालकांशी संवाद

छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.9(डि-24 न्यूज) एखादा पर्यटक, प्रवासी शहरात आल्यापासून तो परत जाण्यापर्यंत त्याच्या वाहनाचा चालक हा त्यासोबत सर्वाधिक वेळ घालवणारा व्यक्ती असतो. टॅक्सीचालक हे शहराचे ब्रँड अँबेसेडर आहेत, त्यांची वागणूकही तशीच असावी. आपल्या वागण्यातील आणि वाहनातील छोटे छोटे बदल पाहून पर्यटक तुम्हाला 'परत भेटू' म्हटल्याशिवाय राहणार नाहीत, असे महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी मंगळवारी सांगितले. 

छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी कोर्पोरेशन, इंडिया टुरिजम आणि औरंगाबाद टुरिजम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चालकांसाठीच्या एकदिवसीय कार्यशाळेत जी श्रीकांत यांनी चालकांशी संवाद साधला. ही कार्यशाळा शहरातील स्मार्ट सिटी कार्यालयात पार पडली. शहरातील पर्यटकांना सेवा देणाऱ्या शंभर चालकांनी मंगळवारी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला. या कार्यशाळेत ताज ग्रुपचे सौरव कृष्णन आणि मानसोपचार तज्ञ रकीब अहमद यांनी अनुक्रमे सेवेतील बारकावे आणि तणाव व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. 

आयुक्त जी. श्रीकांत म्हणाले, 'शहरात पर्यटक, प्रवासी येतो तेव्हा तो चालकाला सर्वात अगोदर भेटतो. शहरातून जातानाही सर्वात शेवटी तो याच चालकासोबत जातो. चालक हे शहराचे ब्रँड अँबेसेडर आहेत. त्यांनी तसेच अगत्यपूर्वक आणि नम्रपणे वागले पाहिजे. या शहरात खूप काही गोष्टी आहेत. हिंदू, मुस्लिम, जैन आणि बौद्ध संस्कृतीचे एवढे मोठे केंद्र आज तरी या देशात नाही. ते आपण जगातून येथे येणाऱ्या पर्यटकांना सांगितले पाहिजे. एखादा पर्यटक हॉटेल किंवा अन्य सुविधा मागत असेल तर तिथे मिळणारी सुविधा उत्तम असायला हवी आणि ते स्वतः चालकांनी तपासायला हवे'. 

या कार्यक्रमासाठी पर्यटन विभागाच्या सहाय्यक संचालक मालती दत्ता, स्नेहल पाटील, छत्रपती संभाजीनगर महानगर पालिका चे उपयुक्त श्री अंकुश पांढरे व औरंगाबाद टुरिजम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष जसवंत सिंग, मोहम्मद इलियास, पर्यटन अधिकारी नोमान खान आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर सहभागी चालकांना प्रमाणपत्रही जी. श्रीकांत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. 

झोप, अन्न आणि सेवेशी तडजोड नको: कृष्णन 

चालकांनी आपल्या व्यवसायात काही गोष्टीत कटाक्षाने पाळायला हव्यात. चांगले दिसणे पासून चांगले राहणे, चांगले बोलणे अत्यंत आवश्यक आहे. लोक पहिले तुमचा चेहरा बघतात मग वर्तन. वर्तनात नम्रपणा असला तर त्या पर्यटकांशी तुमचे नाते अधिक घट्ट होईल. पर्यटक कुठूनही वापस जाताना आठवणी घेऊन जातो. त्यांना गोडच आठवणी नेता आल्या पाहिजेत यासाठी आपल्या कामात विविधता आणायला हवी. मात्र हे करताना चांगली झोप, चांगली सेवा आणि चांगले अन्न याच्याशी तडजोड करू नका, असे ताज ग्रुपचे सौरव कृष्णन यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow