दरोड्याच्या तयारीतील दोघांना पोलिसांनी पकडले, चौघांनी धूम ठोकली...

दरोड्याच्या तयारीतील दोघांना पोलिसांनी पकडले, चौघांनी धूम ठोकली...
वैजापूर, दि.13(डि-24 न्यूज) -
दरोडा टाकण्याच्या उद्देशाने रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या टोळीतील 2 जणांना स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. तर 4 जण अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरले. ही कारवाई शुक्रवार, 12 सप्टेंबर रोजी करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी शनिवार 13 सप्टेंबर रोजी दिली. या कारवाईत पोलिसांनी एक कार आणि दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल साईराम गायकवाड (27 वर्ष), गोविंद निवृत्ती पवार (20 वर्ष), दोघे रा. बेलगाव ता. वैजापूर अशी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींची नावे आहेत. तर लक्ष्मण उर्फ लखन नामदेव जगताप, विक्रम उर्फ विकी बाळासाहेब बोरगे, दोघे रा. भगगाव, ता. वैजापूर व त्यांचे दोन साथीदार असे चौघेही अंधाराचा फायदा घेत पळून गेले. नागपूर - मुंबई महामार्गावरील बेलगाव शिवारात असलेल्या एका ढाब्याजवळ उभ्या असलेल्या कारमध्ये सहा जण दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा मारुन दोघांना पकडले. तर चार जण पळून गेले.
पोलिसांनी कारची झडती घेतली असता, कारमध्ये एक गावठी कट्टा, जिवंत काडतूस, दरोड्यासाठी लागणारी नायलॉन दोरी, वायर कापण्याचे कटर, पत्रा कापण्याचे कटर, हातोडी, छन्नी, लोखंडी पकड, लोखंडी रॉड, चाकू, सी.सी कॅमेऱ्यावर मारण्याचे काळ्या रंगाचे स्प्रे कलर, चेहऱ्याला लावण्यासाठी मास्क, मिरची पावडर, अंबरदिवा, सायरन, पोलिस लाठी, दोन मोबाईल असा एकूण 1 लाख 59 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर अधीक्षक अन्नपुर्णासिंह यांच्या मार्गदर्शनाखील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, उपनिरीक्षक महेश घुगे, पोलिस अंमलदार श्रीमंत भालेराव, सचिन राठोड, बलविरसिंग बहुरे, शिवाजी मगर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
What's Your Reaction?






