दुचाकीला दोनशे तर कारला दोन हजार रुपयांचे मिळणार पेट्रोल, गाडी फुल करण्यास आता लागला ब्रेक...

 0
दुचाकीला दोनशे तर कारला दोन हजार रुपयांचे मिळणार पेट्रोल, गाडी फुल करण्यास आता लागला ब्रेक...

जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज) -जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी एक आदेशही जारी केला आहे. त्यांनी माहिती दिली आहे की, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर इंधन टंचाईबाबत अफवा पसरविल्या जात असल्याने पेट्रोल पंपांवर नागरिकांची अनावश्यक गर्दी होत आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी तसेच सर्वांना समान प्रमाणात इंधन मिळावे यासाठी प्रशासनाने इंधन वितरणाचे योग्य नियोजन केले आहे.

प्रशासनाने नागरिकांच्या हितासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार, सर्व वाहनांना इंधन मिळावे यासाठी दुचाकी वाहनांना 200 रुपयांपर्यंत आणि चारचाकी वाहनांना 2000 रुपयांपर्यंत इंधन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, ज्यामुळे कोणाचीही गैरसोय होणार नाही.

तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने इंधन साठवणूक धोकादायक ठरू शकते, त्यामुळे कॅन किंवा बाटल्यांमध्ये इंधन न घेता थेट वाहनांमध्येच इंधन भरून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांना प्राधान्याने इंधन पुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे.

प्रत्येक पेट्रोल पंपावर इंधनसाठ्याची माहिती फलकावर दर्शविण्यात येणार असून नागरिकांना खरी परिस्थिती समजून घेता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. नागरिकांनी शांतता राखून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow