ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक वापर मर्यादा शिथिलतेचे दिवस निश्चित, जिल्हाधिकारी यांना अधिकार

ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापर मर्यादा शिथिलतेचे दिवस निश्चित
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.15(जिमाका)- ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 च्या नियम 5 च्या उपनियम (3) नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक याचा वापर (श्रोतृगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष या सारख्या बंद जागा तसेच शांतता क्षेत्र वगळून) ध्वनिची विहित मर्यादा राखून 15 दिवस शिथील करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार सन 2025 मध्ये शिथिलता द्यावयाचे 15 दिवस निश्चित करण्यात आले असून या दिवशी ध्वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निर्गमित केले आहेत.
निश्चित केलेले दिवस खालील प्रमाणे-
शिवजंयती बुधवार दि.19 फेब्रुवारी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती सोमवार दि. 14 एप्रिल, श्रीगणेश चतुर्थी बुधवार दि.27 ऑगस्ट, ज्येष्ठागौरी पूजन सोमवार दि.1 सप्टेंबर, ईद ए मिलाद शुक्रवार दि.5 सप्टेंबर, अनंत चतुर्दशी शनिवार दि.6 सप्टेंबर, नवरात्र अष्टमी मंगळवार दि.30 सप्टेंबर, नवरात्र नवमी बुधवार दि.1 ऑक्टोंबर, दिवाळी (लक्ष्मीपूजन) मंगळवार दि.21 ऑक्टोंबर, ख्रिसमस गुरुवार दि.25 डिसेंबर, बुधवार दि.31 डिसेंबर. या शिवाय उर्वरित चार दिवस राखीव असून जिल्ह्यातील महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या गरजेनुसार जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने सूट दिली जाईल,असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
एरवी देखील सक्षम प्राधिकरणाकडून लेखी परवानगी मिळाल्याशिवाय ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर परता येणार नाही या निश्चित केलेल्या दिवसांव्यतिरिक्त अन्य दिवसांना रात्री 10 ते सकाळी 6 या वेळत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करता येणार नाही. शांतता झोन मध्ये (रुग्णालये, शैक्षणिक परिसर, न्यायालये इ.) 100 मीटर पर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही,असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
What's Your Reaction?






