नांदेडमध्ये अतिवृष्टी, 12 जनावरांचा मृत्यू, 21 घरांची पडझड, सतर्कतेचा प्रशासनाचा इशारा

 0
नांदेडमध्ये अतिवृष्टी, 12 जनावरांचा मृत्यू, 21 घरांची पडझड, सतर्कतेचा प्रशासनाचा इशारा

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा...

12 जनावरांचा मृत्यू ; 21 घरांची पडझड

पाऊस थांबताच शेती व अन्य पंचनामे करणार

किनवट, हिमायतनगरमध्ये अधिक पाऊस

प्रकल्प भरले ;धरणाखालील नागरिकांनाही इशारा

नांदेड दि. 1(डि-24 न्यूज ): नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 36 तासांमध्ये पावसाचा जोर कायम असून अजूनही पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील 26 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे. नदी नाले ओसंडून वाहत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमध्ये 12 जनावरे मृत्युमुखी पडली असून 21 घरांची अंशतः पडझड झाली आहे.

आपत्ती व्यवस्थापन ,कृषी, पाटबंधारे, महसूल व पोलीस विभाग स्थितीवर लक्ष ठेवून असून ज्या ठिकाणी मदतीची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी आवश्यक साधनसामुग्रीसह तैणात राहण्याची सूचना बचाव पथकांना केली आहे.

एनडीआरएफचे पथक तैणात असून कोणत्याही आपत्कालीन स्थितीमध्ये नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान महसूल विभागाच्या सतर्कतेने मुदखेड तालुक्यात पुलाव अडकलेल्या नागरिकाची सुटका करण्यात आली आहे.

   शनिवारी सकाळी 10 वाजता पासून रविवारी रात्री 7 वाजेपर्यंत पावसाची कुठे दमदार अतिवृष्टी तर कुठे रिपरिप सुरू आहे. सकाळी 10 पर्यंत आलेल्या आकडेवारी नुसार जिल्ह्यातील 63 मंडळांपैकी 26 मंडळांमध्ये 65 मिली लिटर पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. किनवट सारख्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला. रात्री उशिराही पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदी नाल्यांच्या पाणीपात्रामध्ये वाढ झाली असून नागरिकांनी धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळावे असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पाऊस थांबल्यावर पंचनामे

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या पंचनामा पाऊस थांबल्यानंतर करण्यात यावा असे निर्देश प्रशासनाने दिले आहे. प्राथमिक अंदाजानुसार व आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात झालेल्या अतिवृष्टी मध्ये सहा मोठी दुधाळ जनावरे, पाच छोटी दुधाळ जनावरे एक बैल मृत्युमुखी पडले आहे तर 21 घरांची अंशतः पडझड झाली आहे.

 जिल्ह्यामध्ये 24 तासात सर्वाधिक पाऊस किनवट तालुक्यात झाला आहे. दहा वाजेपर्यंत 136 मिलिमीटर पाऊस तालुक्यात झाला. तालुक्याच्या सिंदगी,उमरी बाजार व किनवट या मंडळात पावसाचा जोर अधिक आहे. किनवटपाठोपाठ हिमायतनगर, माहूर,हदगाव, भोकर, अर्धापूर, मुदखेड, या तालुक्यांमध्ये सध्या पाऊस जोरदार सुरू आहे. नागरिकांनी नाले, ओढे, तलावाच्या भागात जाण्याचे आज टाळावे असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पूरनियंत्रणाची सज्जता

जिल्हयातील प्रकल्पामध्ये सततच्या पावसामुळे वाढ होत असून नदी धरणे व बंधाऱ्यांपुढील नदीपात्रा नजीक राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहे. गोदावरी नदीवरील दिग्रस बंधाऱ्याचे दोन दारे उघडण्यात आली आहे. अंतेश्वर बंधाऱ्याची सर्व दारे उघडण्यात आली आहे. पूर्णा नदीवरील सिध्देश्वर धरणाची दारे उघडली आहे. त्यामुळे विष्णुपुरी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह येत असून या बंधार्‍याचे देखील चार दरवाजे उघडण्यात आले आहे. विष्णूपुरी धरणाचे आणखी काही दारे उघडली जाऊ शकतात. त्या खालच्या आमदुरा धरणाचे 16 पैकी 11 दरवाजे उघडण्यात आले आहे. त्या खालील बडेगाव धरणाचेही नऊ दरवाजे उघडण्यात आले आहे.

ईसापुर धरणाच्या खालील बाजूस अतिवृष्टी होऊन पैनगंगा नदीपात्रात गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. ईसापुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणारा पाण्याचा येवा सध्या कमी झाला आहे.त्यामुळे धरणा खालील पूरस्थिती नियंत्रित करणे शक्य व्हावे याकरीता सायंकाळी 6 वाजता ईसापुर धरणातून पाणी सोडण्या बाबतचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. 

धरणामध्ये असणारा सध्याचा साठा. धरणामध्ये येणारा पाण्याचा नवीन प्रवाह. या महिन्यात धरणामध्ये ठेवायचा जलसाठा हे लक्षात घेऊन प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात येतात. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास अधिकअतिवृष्टी झाल्यास अधिक प्रमाणात पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे या सर्व प्रकल्पाच्या खालील बाजूस असणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

   जिल्ह्यातील अंतर्गत वाहणाऱ्या सर्व नद्या तुडुंब वाहत असून नागरिकांनी आवश्यकता नसेल तर पुलावरून पाणी असल्यास पूल ओलांडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow