नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करुन महसूल सप्ताह यशस्वी करा - जितेंद्र पापळकर
 
                                नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करुन महसूल सप्ताह यशस्वी करा- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर
महसूल विभागाच्या वतीने 1 ऑगस्टपासून महसूल सप्ताह...
सात दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन...
महसूल सप्ताहामध्ये अधिकाधिक नागरिकांना सहभागी करुन घेण्याचे आवाहन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.31 (डि-24 न्यूज): महसूल विभागाच्या वतीने राज्यात 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने विभागात 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल विभागाच्या सेवा, योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा यासाठी महसूल सप्ताहामध्ये अधिकाधिक नागरिकांना सहभागी करुन घ्यावे. सदर कार्यक्रमास जिल्ह्यातील सन्माननीय लोकप्रतिनिधी,पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, स्वयंसेवी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, सर्व घटकातील मान्यवर व्यक्ती तसेच, अन्य विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी यांना निमंत्रित करण्यात यावे. तसेच महसूल सप्ताहानिमित्त नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करुन सप्ताह यशस्वी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले.
राज्य शासनाच्या वतीने 1 ऑगस्टपासून आयोजित करण्यात येत असलेल्या महसूल सप्ताहानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधून आढावा घेताना श्री. पापळकर बोलत होते. यावेळी अपर आयुक्त डॉ.अनंत गव्हाणे, प्रभारी अपर आयुक्त (महसूल ) शुभांगी आंधळे, तहसीलदार अरूण पावडे यांच्यासह विभागस्तरीय अधिकारी उपस्थित होते. विभागातील आठही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी , तहसीलदार, भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
श्री. पापळकर म्हणाले, महसूल सप्ताहात नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात राहील, यासाठी नाविण्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करावे. विभागातील सर्व तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी तसेच महसूल कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा आणि उपक्रम यशस्वी करावा असे आवाहनही त्यांनी केले. महसूल सप्ताह कार्यक्रमासाठी मंडळनिहाय एक नोडल अधिकारी नेमावा तसेच एक टॅगलाईन निश्चित करावी, आपले सरकार सेवा केंद्रांचाही या उप्रकमात समावेश करता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी विभागातील जिल्हाधिकारी यांनी आपल्या जिल्हयात महसूल सप्ताहानिमित्त राबविण्यात येणाऱ्या नाविण्यपूर्ण उपक्रमाबाबत माहिती दिली.
1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान हा महसूल सप्ताह राबविण्यात येणार असून याअंतर्गत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये "महसूल दिनानिमित्त 1 ऑगस्ट रोजी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि निवृत्त महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार होईल. याच दिवशी विविध प्रमाणपत्रांचे वाटपही मान्यवरांच्या हस्ते केले जाईल.
"2 ऑगस्ट रोजी 31 डिसेंबर 2011 पूर्वी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्या पात्र नागरिकांना त्यांच्या घरांचे पट्टे वाटप केले जाणार आहेत.
3 ऑगस्ट रोजी 'पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना' अंतर्गत पाणंद आणि शिवपांदण रस्त्यांवरील वाद मिटवण्यासाठी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी स्तरावर दोन अपीलनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.
4 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत महसूल मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन होऊन प्रलंबित प्रकरणे निकाली काढली जाणार आहेत. आधार कार्ड, संजय गांधी योजना ओळखपत्र, अधिवास, जात, उत्पन्न आणि जात वैधता प्रमाणपत्रांचे वाटप होईल.
5 ऑगस्टला डिबिटी प्रणाली करिता आवश्यक e KYC बाबत अडचणी दूर करण्यात येणार आहेत.
6 ऑगस्ट रोजी शासकीय जमीनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणे, व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनीबाबत शासन धोरणानुसार निर्णय घेणे.
7 ऑगस्ट रोजी कृत्रिम वाळू धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कार्यशाळा आणि शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ होणार आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            