पदवीधर मतदार संघाचे नाव निवडणुकीपूर्वी बदलण्याची भाजपाची मागणी
पदवीधर मतदार संघाचे नाव मराठवाडा पदवीधर मतदारसंघ करावे. – प्रवीण घुगे यांची मागणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज)-मराठवाड्यामध्ये पदवीधर मतदार संघाची निवडणूक येऊ घातली आहे. या मतदारसंघाची मतदार नोंदणीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. मात्र या कार्यक्रमांमध्ये या मतदारसंघाचे नाव 5 औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ असे नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे नामांतर केलेले असताना आणि केंद्र सरकारची त्यास मंजुरी मिळून अंमलबजावणी सुरू झाली असताना या मतदारसंघाचे नाव मात्र अजून औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ असेच ठेवण्यात आले आहे. यावर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते प्रवीण घुगे यांनी आक्षेप घेतला आहे. या मतदारसंघाचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर मराठवाडा पदवीधर मतदारसंघ असे करण्यात यावे, अशी मागणी प्रवीण घुगे यांनी केली आहे. या मागणीसाठी राज्य सरकार सोबतच महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करणार असल्याचे श्री प्रवीण घुगे यांनी सांगितले. आता केवळ मतदान नोंदणीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. अजून प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नसल्यामुळे हा बदल करणे शक्य आहे, असेही ते म्हणाले. यासाठी आवश्यक ती पूर्तता निवडणुकीचा प्रत्यक्ष कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी करण्यात यावी आणि या मतदार संघाच्या नावातून औरंगाबाद हद्दपार करण्यात यावे, असेही ते म्हणाले.
याबाबतचे निवेदन आज विभागीय आयुक्त तथा पदवीधर मतदार नोंदणी अधिकारी जितेंद्र पाफळकर यांना देण्यात आले. या वेळी प्रवीण घुगे यांच्यासह मराठवाडा युवक विकास मंडळाचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे, सचिव अरविंद केंद्रे ,मिलिंद पोहनेरकर ,केशव पारटकर , मनोज शेवाळे, कुणाल राठोड यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?