प्रतिबंधित गुटख्याचा अवैध व्यापार करणाऱ्यांवर मकोका लागणार, आयुक्त तुकाराम मुंढें यांचे आदेश...

 0
प्रतिबंधित गुटख्याचा अवैध व्यापार करणाऱ्यांवर मकोका लागणार, आयुक्त तुकाराम मुंढें यांचे आदेश...

प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या अवैध व्यापारावर मकोका; आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक निर्देश...

मुंबई, दि.13(डि-24 न्यूज) – महाराष्ट्रात गुटखा, तंबाखू, निकोटीनयुक्त पानमसाला आणि इतर प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या संघटित अवैध व्यापारावर कठोर कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. गंभीर आणि पात्र प्रकरणांमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) लागू करण्याचे स्पष्ट निर्देश अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाल्याचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री करणाऱ्या संघटित नेटवर्कविरोधात मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार, केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता संपूर्ण साखळीवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. यामध्ये उत्पादक, प्रमुख पुरवठादार, वितरक, वाहतूकदार, गोदाम चालक, घाऊक विक्रेते आणि उप-विक्रेते यांच्याविरोधातही पुराव्यांच्या आधारे कारवाई केली जाणार आहे.

अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 अंतर्गत प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक व विक्री हा गंभीर गुन्हा मानला जातो. पुनरावृत्ती झाल्यास अधिक कठोर शिक्षेची तरतूद असून अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना तपास, शोध आणि जप्तीचे अधिकार देण्यात आले आहेत.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, मकोका लागू असलेल्या प्रकरणांमध्ये जामीन अर्जांवर प्रभावी विरोध करण्यात येईल. तसेच प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकरणांची स्वतंत्र नोंद ठेवून FIR, आरोपपत्र, जप्ती, तपास व अंतिम निकालावर विशेष देखरेख ठेवली जाणार आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या संघटित अवैध व्यापारावर कठोर कारवाई केली जाईल, मात्र कायद्याचे पालन करणाऱ्या व्यापाऱ्यांना कोणताही त्रास देण्याचा उद्देश नसल्याचेही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow