"शाळा प्रवेशोत्सव-2026"निमित्ताने पोलिस काका-दिदींकडून स्वागत केले जाईल...
“शाळा प्रवेशोत्सव-2026” निमित्त विद्यार्थ्यांचे पोलीस काका-दिदीकडून स्वागत
छत्रपती संभाजीनगर, दि. 13(डि-24 न्यूज) – जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू होत असताना विद्यार्थ्यांचे स्वागत अधिक सुरक्षित आणि आपुलकीच्या वातावरणात व्हावे यासाठी “शाळा प्रवेशोत्सव-2026” उपक्रमांतर्गत ग्रामीण पोलिसांकडून विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी पोलीस काका आणि पोलीस दिदी विद्यार्थ्यांचे स्वागत करणार असून त्यांच्याशी थेट संवादही साधणार आहेत.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करणे, पोलिसांबद्दल आत्मीयता वाढविणे आणि शालेय जीवनापासूनच विश्वासाचे नाते निर्माण करण्याच्या उद्देशाने पोलीस अधिकारी शाळांना भेट देणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये भेट देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी शिक्षक व पालकांच्या उपस्थितीत बालसंरक्षण, आपत्कालीन हेल्पलाईन, वाहतूक नियम, सायबर सुरक्षा तसेच सोशल मीडियाचा सुरक्षित वापर यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
शाळेच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना पोलीस हे मित्र म्हणून भेटतील. तसेच शाळा सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळेत शाळा परिसरात टवाळखोरी करणाऱ्या रोडरोमिओंवर लक्ष ठेवण्यासाठी दामिनी पथकाची नियमित गस्तही राहणार आहे.
याशिवाय, पोलीस काका आणि पोलीस दिदी विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना किंवा परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती त्रास देत असल्यास, पाठलाग करत असल्यास किंवा कोणत्याही प्रकारे भीती निर्माण करत असल्यास तात्काळ पालक, शिक्षक किंवा पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुला-मुलींना निर्भयपणे तक्रार करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी स्पष्ट केले की, विद्यार्थ्यांची सुरक्षा ही पोलिसांची सर्वोच्च प्राथमिकता असून शाळेच्या पहिल्याच दिवसापासून पोलिसांचे रूप विद्यार्थ्यांसाठी मित्रत्वाचे राहील. पोलीस काका आणि पोलीस दिदी या उपक्रमातून विद्यार्थ्यांशी अधिक जवळीक साधत त्यांच्यात सुरक्षिततेची भावना बळकट केली जाईल.
What's Your Reaction?