राज्यातील शेतक-यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी शिवसेनेने केले चक्का जाम आंदोलन...
 
                                 
 
राज्यातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी
शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हास्तरीय चक्का जाम आंदोलन
शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आंदोलन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज) : राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी तसेच महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाचा विसर पडल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हास्तरीय चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शहरातील बाबा पेट्रोल पंप येथील चौकात शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
बाबा पेट्रोल पंप येथे अहिल्यानगर जिल्हामार्गे येणारा रस्ता, रेल्वे स्टेशन मार्गे येणारा रस्ता, मध्यवर्ती बस स्थानक मार्गे येणारा रस्ता आणि क्रांती चौक मार्गे येणारा जालना रोड हे मुख्य रस्ते शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व शेतकऱ्यांनी अडविले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे... शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा मिळालाच पाहिजे.. लबाड सरकार मुर्दाबाद.. आश्वासन देऊन पळ काढणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणाबाजी आंदोलकांनी यावेळी केल्या. आंदोलकांनी शहराचे मुख्य रस्तेच अडविल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन क्रांती चौक पोलीस स्टेशनात आणल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सोडवून दिले.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी. राज्य सरकारला शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याने लबाड सरकारला शेतकऱ्यांचा आक्रोश लक्षात यावा. तसेच विधानसभा निवडणूक दरम्यान आश्वासन दिलेल्या 10 कलमी योजना राबविण्यात याव्या, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.
दरम्यान, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर यांनी गुलाबी फेटा, धोतर आणि कुर्ता घालून शेतकऱ्यांचा आसूड पुस्तकांचे लेखक व दिवंगत थोर समाजसेवक महात्मा फुले यांच्या पेहरावात या आंदोलनात सहभागी झाले होते.
याप्रसंगी महानगरप्रमुख राजू वैद्य, उपजिल्हाप्रमुख अरविंद धिवर, संतोष जेजुरकर, अशोक शिंदे, विजय वाघमारे, संतोष खेंडके, विठ्ठल बदर पाटील, चंद्रकांत गवई, शहरप्रमुख दिग्विजय शेरखाने, विधानसभा संघटक वीरभद्र गादगे, शहर संघटक सचिन तायडे, तालुकाप्रमुख संजय मोटे, शंकरराव ठोंबरे,प्रभारी तालुकाप्रमुख विष्णू जाधव, प्रभारी शहरप्रमुख विशाल खंडागळे, उपशहरप्रमुख बापू कवळे, जयसिंग होलीये, प्रमोद ठेंगडे, संजय बापू पवार, रवी गायकवाड, युवासेना शहराधिकारी रामेश्वर कोरडे, महिला आघाडी संपर्क संघटक सुनिता आऊलवार, सुनिता देव, दुर्गा भाटी, जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले, मीना फसाटे, शहर संघटक सुनीता सोनवणे, सुनिता औताडे, भागूआक्का शिरसाठ, विधानसभा संघटक मीरा देशपांडे व अंजना गवई आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            