नवीन अपर तहसीलदारांची धडाकेबाज कारवाई, अवैध गौण खनिज उत्खनन करणारे 11 वाहने पकडली...!

 0
नवीन अपर तहसीलदारांची धडाकेबाज कारवाई, अवैध गौण खनिज उत्खनन करणारे 11 वाहने पकडली...!

नवीन अपर तहसीलदारांची धडाकेबाज कारवाई, गौण खनिजचे अवैध उत्खनन करणारे 11 वाहने पकडली...

देवळाई परिसरात धडाकेबाज कारवाई

छ. संभाजीनगर(औरंगाबाद),दि.28(डि-24 न्यूज) विना परवाना जमिनीचे सपाटीकरण करण्याच्या नावाखाली गौण खनिजचे अवैध उत्खनन करणारे 11 वाहने नवीन अपर तहसीलदार नितीन गर्जे यांच्या पथकाने पकडली आहेत यामुळे खळबळ उडाली आहे.

 यामध्ये सहा हायवा तर पाच पोकलेनचा समावेश आहे. सकाळी दहा वाजेपासून सुरू झालेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनांवर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ असावी. यामुळे माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी पदमपुरा भागात कारवाई करीत अवैधरित्या वाळू वाहतूक आणि साठा करणारी अकरा वाहने पकडली होती. जप्त करून आणलेल्या सहा वाहनांपैकी तीन वाहने वाळू माफियांनी तहसील कार्यालयातून चोरली होती. तेव्हापासून महसूल विभागाच्या टार्गेटवर वाळू माफिया आणि गौण खनिज माफिया आले होते. बुधवारी सकाळी अपर तहसीलदार नितीन गर्जे हे पथकासह खाजगी वाहनातून गस्त घालत असताना देवळाई भागातील गट क्रमांक 71 मध्ये त्यांना 5 पोकलेनने मुरुमाचे उत्खनन करीत त्याची 6 हायवातून वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले. पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठले. महसूलचे पथक आल्याचे पाहून हायवा चालक आणि पोकलेन चालकांनी वाहनातून उड्या मारून घटनास्थावरून पळ काढला. महसूल विभागाने कारवाई केल्याची माहिती देवळाई परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे वाळू माफिया, गौख खनिज माफिया आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली. गर्दी वाढत असल्याचे पाहून नितीन गर्जे यांनी चिकलठाणा पोलीस ठाण्याला माहिती देऊन फोर्स मागविला. तसेच आरटीओ कार्यालयालाही कारवाईची माहिती दिली. थोडा वेळाने त्या ठिकाणी संबंधित जमीन मालक हजर झाले. त्यांनी अवैध उत्खननाबाबत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. परंतु महसूल अधिकाऱ्यांनी त्याचे स्पष्टीकरण मान्य केले नाही. या जमिनीच्या सपाटीकरणाला केवळ 9 ऑगस्टपर्यंतच परवानगी होती. तसेच सपाटीकरणात केवळ जमिनीचे सपाटीकरण करता येते त्यातून गौण खनिजची उत्खनन करून वाहतूक करता येत नाही. असे असतानाही अवैध उत्खनन आणि वाहतूक केली जात असल्याने कारवाई केली जात असल्याचे गर्जे यांनी सांगितले. मात्र या भागातील नागरिक जास्तच आक्रमक होत असल्याचे पाहून ग्रामीणचे तहसीलदार रमेश मुंडलोड आणि इतर कर्मचाऱ्यांनाही पाचारण केले. अतरिक्त पोलीस बंदोबस्तही मागविण्यात आला. कारवाईत अप्पर तहसीलदार नितीन गर्जे, नायब तहसीलदार प्रशांत देवडे, महसूल सहाय्यक संदीप हापत, महसूल सहाय्यक श्रीकांत अंकुश, रामदास मोगल, शिवाजी हरकळ तसेच अव्वल कारकून जितेंद्र जाधव यांचा समावेश होता.

सकाळी दहा वाजता सुरू झालेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणी दंडात्मक कारवाईसह गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. या कारवाईने माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

पथकाने छापा मारताच वाहन चालक वाहने सोडून पळून गेली. त्यामुळे खाजगी चालकांची मदत घेत तीन हायवा तहसील परिसरात लावण्यात आली. तर पोकलेन रस्त्याने चालवित आणता येत नसल्याने ते आणण्यासाठी वाहतूक करणारे विशिष्ट ट्रक मागविण्यात आले. तहसील कार्यालयाच्या परिसरात जप्त केलेल्या वाहनांची गर्दी असल्याने जप्त केलेल्या वाहनांची पार्कीग कोठे करावी, असा प्रश्न महसूलच्या कर्मचाऱ्यांना पडला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow