बुधवारी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे पत्रकारांसाठी कार्यशाळा...

जिल्हा माहिती कार्यालयातर्फे पत्रकारांसाठी
बुधवारी (दि.16) एक दिवसीय कार्यशाळा*
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज)- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने जिल्हा माहिती कार्यालयातर्फे बुधवार दि.16 रोजी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सकाळी 11 वाजेपासून ही कार्यशाळा होईल.
कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते होणार असून उद्घाटन सोहळ्यास अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी संचालक(माहिती) किशोर गांगुर्डे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन विभागाचे विभागप्रमुख डॉ. दिनकर माने, एमजीएम विद्यापीठाच्या स्कूल ऑफ जर्नालिझमच्या प्राचार्य डॉ. रेखा शेळके, विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष डॉ. माधव सावरगावे हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित आहेत.
या कार्यशाळेत अधिस्वीकृती नियमावली, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी या विषयांवर जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता याविषयावर जिल्हा सुचना विज्ञान केंद्राचे शरद दिवेकर तर वृत्तसंकलन-संपादनात शुद्ध लेखनाचे महत्त्व या विषयावर प्रा. दीपक रंगारी, परभणी हे मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यशाळेस सर्व पत्रकार, वृत्तपत्र प्रतिनिधी, संपादक आदींनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी केले आहे.
What's Your Reaction?






