भरधाव स्काॅर्पिओच्या धडकेत दुचाकीस्वार चिमुकल्या सह 3 ठार...

भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत दुचाकीस्वार 3 जण ठार...
वरखेड शिवारात भीषण अपघात...
गंगापूर (डि-24 न्यूज) - भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिओ जीपने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार दांम्पत्यासह एक वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी अंत झाला. हा भीषण अपघात गंगापूर तालुक्यातील वरखेड शिवारातील नांदूर-मधमेश्वर कालवा रस्त्यावर सोमवार, 8 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सजन राजू राजपूत (वय 28 वर्ष), शितल सजन राजपूत ( वय 25 वर्ष), कृष्णांश सजन राजपूत (1 वर्ष), सर्व रा. सटाणा. ता. गंगापूर, ह.मु. वाळूज महानगर असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. गंगापूर तालुक्यातील सटाणा गावचे रहिवासी असलेले सजन राजपूत हे वाळूज औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत नोकरीला होते. कंपनीत सुट्या असल्यामुळे सजन राजपूत पत्नी शितल आणि एक वर्षाच्या मुलासह सटाणा या मुळगावी गेले होते. सोमवारी सकाळी तिघेही दुचाकीवर वाळूज गावाकडे परत येत असतांना वरखेड शिवारातील नांदूर-मधमेश्वर कालवा रस्त्यावर त्यांच्या दुचाकीस भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिओ जीप क्रमांक (एमएच-19- बीयू-4214) ने जोराची धडक दिली. अपघातानंतर तिघेही हवेत उंच उडून शेतात जावून पडल्याने गंभीर जखमी झाले होते.
या अपघाताची माहिती मिळताच शिल्लेगाव पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिघांना उपचारासाठी गंगापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉ. विशाल सूर्यवंशी, डॉ. मुजम्मिल शेख यांनी तिघांना तपासून मृत घोषित केले. या अपघाताची नोंद शिल्लेगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलिस अंमलदार विनोद बिघोत करीत आहेत.
नातेवाईकांनी फोडला हंबरडा...
सजन राजपूत, शितल राजपूत, कृष्णांश राजपूत यांचा अपघात झाला असल्याची माहिती सटाणा येथे राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांना समजल्यावर त्यांनी गंगापुरच्या उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी तिघांना तपासून मृत घोषित केल्याचे समजताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला. नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थित नागरिकही हळहळ व्यक्त करीत होते.
What's Your Reaction?






