महापुरुषांच्या ओळख करून देणारे गुरुजी हरपले, निकम गुरुजींना सर्वपक्षीय श्रद्धांजली...

‘ महापुरुषांची ओळख करुन देणारे ‘ गुरुजी’ हरपले
निकम गुरुजींना सर्वपक्षीय श्रध्दांजली
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज): ‘ महापुरुषांच्या जयंती- पुण्यतिथी उत्सवांचे आयोजन करण्यात पुढाकार घेणारे, क्रांती चौकातून निघणा-या मिरवणुकांमध्ये स्वत: हलगी वाजवणारे व मुलांना लेझीमच्या तालावर ठेका धरायला लावणारे आणि या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला महापुरुषांची ओळख करुन देणारे ‘ गुरुजी’ निकम गुरुजींच्या रुपाने हरपले अशा शब्दांत बुधवारी सर्वपक्षीय शोकसभेत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
गांधी भवन, समर्थनगर येथे ही सभा विचारवंत प्राचार्य ग. ह. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. निकम गुरुजींच्या नावे प्रतिष्ठानची स्थापना करुन त्याव्दारे लेझीम व हलगी वादनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. प्रारंभी, निकम गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी प्रतिमेस फुले वाहिली. कॉ. अभय टाकसाळ यांनी प्रास्ताविक केले. शाहीर उत्तम म्हस्के, शाहीर संभाजी गायकवाड व कवी सुरेश खरात यांनी काव्य सुमनांजली अर्पण केली.
माजी खासदार इम्तियाज जलिल, माजी न्यायाधिश डी. आर. शेळके, साथी सुभाष लोमटे, शशिकांत नीळकंठ गुरुजी, एस. पी. जवळकर, भाई ज्ञानोबा मुंढे, माजी नगरसेवक राधाकृष्ण गायकवाड, मराठवाडा शिक्षक संघाच्या नेत्या कॉ. सुलभा मुंडे, कॉ. भीमराव बनसोड, सामाजिक कार्यकर्ते अंबादास रगडे, माजी नगरसेवक मोतीलाल जगताप, जय सेवालाल बहुजन विकास पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीराम जाधव, सुभाष पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर धर्मनिरपेक्ष जयंती उत्सव महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रतनकुमार पंडागळे, गांधी स्मारक निधीतर्फे प्रा. डॉ. मच्छिंद्र गोरडे पाटील, भारतीय दलित पॅंथरचे नेते ॲड. रमेशभाई खंडागळे आदींनी निकम गुरुजींच्या अनेक आठवणी सांगितल्या. या आठवणी सांगताना काही जण गहिरुन गेले होते. निकम गुरुजी हे कडक स्वभावाचे असले तरी मनाने ते तेवढेच ऋजू व मृदू स्वभावाचे होते. अनेक वर्षे त्यांनी राज्यपातळीवर लोककला महोत्सवांचे आयोजन करुन त्यांनी कलावंत घडवले. मदतीसाठी तर त्यांचा हात सदैव पुढे असायचा’ असे उद्गार वक्त्यांनी काढले.
What's Your Reaction?






