महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करा- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

 0
महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करा- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी बचतगटाच्या योजनांसह विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा - केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

 

महिला बचतगटांसह विविध योजनांच्या लाभार्थ्यांना कर्जवाटप...

 

औरंगाबाद, दि.23(डि-24 न्यूज) महिला बचतगटांच्या विविध उत्पादनांला आवश्यक बाजारपेठ मिळवून देण्यासोबतच महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी बचतगटाच्या योजनांसह विविध योजनांची प्रभावीपणे अंमबबजावणी करा, असे निर्देश केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज दिले. सर्वसामान्य, कष्टकरी तसेच गरजूंना उद्योगासाठी बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री स्वनिधी योजना व महिला बचतगटांना अधिकाधिक योजनांचा लाभ द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

 

मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे महिला बचत गटांसह विविध योजनांच्या लाभार्थ्यांना कर्जवाटप कार्यक्रमात डॉ. कराड बोलत होते. यावेळी एसबीआयचे जितेंद्र ठाकूर, मनपाचे उपायुक्त रणजित पाटील, एसबीआयचे समन्वयक डॉ. सतिश टाके तसेच इतर बँकेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 

देशात बँकेच्या माध्यमातून विविध योजनांमधून बचतगटांना तसेच नागरिकांना कर्जपुरवठा करण्यात येत असून कर्जाची परतफेडही सुलभतेने होत आहे, ही महत्त्वाची बाब आहे. यामध्ये महिला लाभार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. महिला काटकसरीने व नियोजन करून बचतगटाच्या माध्यमातून स्वावलंबी होत आहेत. आपल्याला कर्जासाठी बँकेत जाण्याऐवजी बँकेचे प्रतिनिधी आपल्याकडे येत आहेत. ही बाब उल्लेखनीय आहे. महानगरासह जिल्हयातील बचतगटाच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचेही डॉ. कराड यांनी सांगितले.

 

 

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबाला व्यवसायांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची योजना आधार देणारी आहे. राज्यात मोठया प्रमाणात बँकां या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुढे आल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशात विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. बँक खाते नसलेल्यांचे खाते उघडणे, विमा योजनेचा सर्वसामान्यांना लाभ देणे आणि अर्थ सहाय्यापासून वंचित असलेल्यांना ते उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचेही डॉ. कराड म्हणाले.

 

फेरीवाल्यांचे बँकेत खाते, आधार आणि महानगरपालिकेत नोंदणी असल्यास त्यांच्यासाठी स्वनिधी योजना आहे. प्रथम 10 हजार रुपये कर्ज आणि वेळेवर परतफेड केल्यास 20 हजार व त्यानंतर 50 हजार रुपये कर्ज देण्यात येईल. योजनेतून बचतगटातील महिला, डेअरी, फळविक्रेते, भाजीविक्रेते तसेच फेरीवाले व छोटे व्यावसायिक यांच्या कौटुंबिक अर्थव्यवस्थेला हातभार लावणारी ही योजना आहे. देशात मोठया प्रमाणात जनधन खाते सुरू करण्यासोबत या खात्यांशी आधार व मोबाईल जोडणी केल्याने लाभार्थ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत पोहोचविणे शक्य झाले आहे. प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना, उज्वला गॅस योजना यासह विविध योजनेतून सर्वसामान्यांना आधार देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

महानगरातील घरा-घरात गॅसलाईनचे काम प्रगतीपथकावर सुरू आहे. आज बचतगटाच्या माध्यमातून जवळपास 17 कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात येत आहे. प्रशासनाला कर्जवाटपाचे देण्यात आलेले उदिष्ट पूर्ण झाले असून वेळेवर कर्जफेड केल्याने 100 टक्यांवरुन अधिकच्या लाभार्थींना कर्जवाटप करण्यात येत आहे. प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेतून पाच लाख रूपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात.

 

       डॉ. कराड यांच्या हस्ते एसबीआय बँकेकडून यश सहारा महिला बचतगटाला 9 लाख 50 हजार, जहेदिया महिला बचतगट 9 लाख 50 हजार, सृष्टी महिला बचत गटाला 9 लाख 50 हजार , श्री स्वामी समर्थ महिला बचत गट 9 लाख 50 हजार, ओमसाई महिला बचतगट 9 लाख 50 हजार तसेच बॅक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून विशाखा महिला गटाला 10 लाख रुपये तर एमजीएम बॅकेकडून ददिरा लोंखडे यांना दुध डेअरी व्यवसायासाठी 20 लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.

 

         मनपाचे उपायुक्त रणजित पाटील यांनी बचतगटाने सुरुवातीला 10 हजार रुपये कर्ज वेळेवर भरणा केल्यास पुढील कर्जात 20 हजार ते 50 हजार पर्यंत कर्ज मिळत राहते. बँकेच्या दिलेल्या उदिष्टापेक्षाही अधिकचे उदिष्ट गाठले आहे. पीएम स्वनिधी व बचतगट यांच्या अंतर्गत लाभार्थ्यांना कर्ज वाटपाविषयी त्यांनी माहिती दिली.

 

   यावेळी महिला बचतगट तसेच विविध उद्योजक यांच्यासह पात्र लाभार्थीना कर्ज धनादेश प्रदान करण्यात आले. सुत्रसंचालन श्रीमती निता पानसरे यांनी केले.

       यावेळी पीएम स्वनिधी लाभार्थी, नागरिक, बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow