महेमुदपुरा हेरिटेज वाॅकचे रविवारी आयोजन, निजामशाहीकालीन वारशाची ऐतिहासिक सफर...!
महमूदपुरा हेरिटेज वॉकचे रविवारी आयोजन
निजामशाहीकालीन वारशाची ऐतिहासिक सफर...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज) - मध्ययुगीन काळातील बलाढ्य फौजांना दख्खनमध्ये आपल्या कर्तृत्वाने थोपवणारा आणि नहरीने पाणी आणून जुन्या खडकीचे सुनियोजित शहरात रूपांतर करणारा निजामशाहीचा वजीर मलिक अंबर यांच्या ऐतिहासिक वारशाची ओळख करून देण्यासाठी ‘महमूदपुरा हेरिटेज वॉक’चे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि INTACH, छत्रपती संभाजीनगर चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने हा हेरिटेज वॉक रविवार, दि. 30 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
महापौर श्री समीर राजुरकर यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या पर्यटन विभागाचे वतीने आयुक्त अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार व उप आयुक्त तथा विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ऐतिहासिक ठिकाणी हेरिटेज वॉकचे यशस्वी आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमास नागरिक ,इतिहास प्रेमी आणि विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात साथ लाभत आहे. याच अनुषंगाने दिनांक 30 ऑगस्ट रोजी हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे.
या हेरिटेज वॉकची सुरुवात नहर-ए-अंबरी गोमुख, ताज हॉटेलसमोर येथून होणार असून सांगता श्री निळकंठेश्वर महादेव मंदिर, वानखेडेनगर येथे होणार आहे. या माध्यमातून महमूदपुरा परिसरातील ऐतिहासिक वास्तू, स्थापत्यशैली, जलव्यवस्था आणि निजामशाहीकालीन वारशाचा जवळून परिचय करून दिला जाणार आहे.
ऐतिहासिक वारशाचा समृद्ध ठेवा महमूदपुरा परिसरातील ऐतिहासिक मकबरा, नहर-ए-अंबरीचा ऐतिहासिक वारसा तसेच श्री निळकंठेश्वर महादेव मंदिरातील राजपूत छत्री शैलीतील बारादरी ही या हेरिटेज वॉकची प्रमुख आकर्षणे आहेत. या वास्तूंच्या माध्यमातून शहराच्या समृद्ध इतिहासातील अनेक महत्त्वपूर्ण पैलू नागरिकांसमोर उलगडले जाणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहराचा ऐतिहासिक वारसा केवळ वास्तूंमध्ये सीमित नसून त्यामागील जलव्यवस्था, स्थापत्यकला, सामाजिक जीवन आणि तत्कालीन नगररचनेची माहितीही या उपक्रमातून नागरिकांना अनुभवता येणार आहे.
इतिहासप्रेमी, विद्यार्थी, संशोधक आणि नागरिकांनी आपल्या शहराच्या ऐतिहासिक वारशाची ओळख करून घेण्यासाठी या हेरिटेज वॉकमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक सहायक आयुक्त ऋतुजा पाटील, मार्गदर्शक Intach चे संकेत कुलकर्णी व आदित्य वाघमारे यांनी केले आहे.
What's Your Reaction?