मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 6 महीन्यात 722 रुग्णांना 6 कोटी 4 लाख रुपयांची मदत

 0
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 6 महीन्यात 722 रुग्णांना 6 कोटी 4 लाख रुपयांची मदत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून जीवदानाचे पूण्यकर्म...

गेल्या सहा महिन्यात 722 रुग्णांना 6 कोटी 4 लाख रुपयांची मदत...

आरोग्याचे संकट कधी,कसे आणि कोणासमोर उभे ठाकेल याचा नेम नाही. आर्थिक स्थिती बरी असेल तर ठिक पण नसेल तर किंवा उपचाराचा खर्च हा आवाक्या बाहेर असेल तर ? आजारी एक माणूस पडतो पण त्याच्या उपचारासाठी सगळ्या कुटुंबाला वणवण फिरावे लागते. कधी कधी असे दुर्धर आजार बळावतात. ज्याचे उपचार सामान्यांच्या कुवतीबाहेर असतात. पण असे असले तरी उपचार सोडून देता येत नाहीत. आणि हातावर हात धरुन बसूही शकत नाही. अशावेळी मदतीला येते ती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मदत कक्ष. शासन किती संवेदनशील असते याचा प्रत्यय देणारी ही योजना. आधी या योजनेतून मदत मिळविण्यासाठी मुंबई गाठावी लागत असे. आता गोरगरीब जनतेला दुर्धर आजारांवरउपचार खर्च वेळेत मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक जिल्ह्याला मुख्यमंत्री सहायता निधी मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयातच स्थापन केले आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळविण्यासाठी आता मुंबईत जाण्याची गरज नाही. जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातच हा कक्ष सुरु झाल्यामुळे रुग्णांना त्वरीत मदत मिळणे शक्य झाले आहे.

 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री वैद्यकीयि सहायता निधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. दि.1 जानेवारी 2025 पासून हा कक्ष कार्यान्वित असून दि.1 मे 2025 रोजी राज्याचे सामाजीक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते कक्षाचे औपचारिक उद्घाटन झाले. वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी गोरे हे या कक्षाचे समन्वयक म्हणून काम करीत आहेत. या कक्षात दाखल अर्जांची तातडीने पडताळणी करून ते मुंबईकडे पाठवले जातात. हा कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळ मजल्यावर मागील बाजूस सुरु असून नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

722 रुग्णांना 6 कोटी 4 लाख रुपयांची मदत...

दि.1 जानेवारी ते दि.21 जुलै 2025 या कालावधीत जिल्ह्यात आता पर्यंत एकूण 704 रुग्णांना या सहायता निधीचा लाभ मिळाला असून मुख्यमंत्री वैद्यकीयि सहायता निधीच्या मार्फत 6 कोटी 4 लाख 97 हजार 500 रुपये इतका मदत निधी देण्यात आला आहे.

त्यात जानेवारी महिन्यात 69 रुग्णांना 62 लाख 5 हजार रुपये, फेब्रुवारी महिन्यात 82 रुग्णांना 71 लाख 35 हजार रुपये, मार्च महिन्यात 99 रुग्णांना 83 लाख रुपये, एप्रिल महिन्यात 111 रुग्णांना 95 लाख 22 हजार 500 रुपये, मे महिन्यात 138 रुग्णांना 1 कोटी 11 लाख 30 हजार रुपये, जून महिन्यात 134 रुग्णांना 1 कोटी 10 लाख 45 हजार रुपये तर जुलै महिन्यात (दि.21 अखेर) 89 रुग्णांना 71 लाख 60 हजार रुपये अशी 6 कोटी 4 लाख 97 हजार 500 रुपयांची मदत देण्यात आली आहे.

 1 मे 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरू झाल्यानंतर मदतीच्या प्रमाणात जवळपास चारपट वाढ झाली आहे, हे विशेष. रुग्ण दवाखान्यात भरती झाल्यानंतर दोन दिवसांत अर्ज दाखल केल्यास व कागदपत्रे पूर्ण असल्यास पाच दिवसांतच निधी संबंधित रुग्णालयाच्या खात्यात जमा होतो. सध्या जिल्ह्यातील 168 नोंदणीकृत रुग्णालयांमधून हा निधी मिळवता येतो.

मदतपात्र आजार...

मदतनिधी हा विविध प्रकारच्या आजारांसाठी मिळतो. त्यात हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, मूत्रपिंड प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, अस्थिमज्जा प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, खुब्याचे प्रत्यारोपण, कर्करोग शस्त्रक्रिया, कर्करोग औषधोपचार व किरणोपचार, अस्थिबंधन, नवजात शिशूचे संबंधित आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, रस्ते अपघात ,लहान बालकांच्या संबंधित शस्त्रक्रिया, त्याचप्रमाणे मेंदूचे आजार, हृदयरोग डायलिसिस ,जळीत रुग्णावरील उपचार आणि विद्युत अपघात तसेच विद्युतजळीत रुग्ण अशा विविध आजारांचा समावेश आहे. तसेच कर्करोग, हृदयविकार, मेंदूविकार, नवजात बालकांचे गंभीर आजार, मूत्रपिंड व लिव्हर प्रत्यारोपण, अपघातातील शस्त्रक्रिया, महागड्या ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया अशा गंभीर व जीवघेण्या आजारांवरील उपचारासाठी मदत दिली जाते. याशिवाय मदतीस पात्र नसल्यास महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यासारख्या पर्यायी योजनांची माहितीही रुग्णांना देण्यात येते.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया...

अर्जदारांनी निधीसाठी अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात. त्यामध्ये विहित नमुन्यातील अर्ज, रुग्ण दाखल असल्याचा स्थाननिश्चिती (जीओ टॅग) केलेले छायाचित्रे, उपचार खर्चाचे अंदाजपत्रक (खासगी रुग्णालय असल्यास जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र आवश्यक), 1 लाख 60 हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असल्याबाबतचा तहसीलदार यांचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, आजाराशी संबंधित निदानात्मक कागदपत्रे तसेच अपघातग्रस्त रुग्णासाठी पोलिसांचा एफआयआर, प्रत्यारोपणाच्या बाबतीत विभागीय समितीचा अहवाल अशी कागदपत्रे बंधनकारक आहेत. अर्थसाह्य मागणी ही ऑनलाईन पद्धतीने ईमेलद्वारे केलेली असल्यास मूळ अर्जासह सर्व कागदपत्रे एकत्रित पद्धतीने वाचता येतील अशा स्वरूपात पीडीएफ स्वरूपात ती पाठवावी लागतात.

राज्याचा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष हा एकमेव कक्ष आहे की या कक्षाला परदेशातून मदत येते म्हणजेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीला एफसीआरए अंतर्गत देणगी मिळते. या निधीचा उपयोग रुग्णांच्या उपचारासाठी सामाजिक दायित्व भावनेतून मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या अंतर्गत गरजू रुग्णांना वितरित केला जातो. महाराष्ट्र हे एकमेव असं राज्य आहे की यासाठी परदेशातून निधी महाराष्ट्राला दिला जातो.        

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत मिळविण्यासाठी ई-मेलद्वारे अर्ज करता येतो. त्यासाठी ई-मेल आयडी aao.cmrf-mh@mah.gov.in असा आहे. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक- 18001232211 आहे. यावर फोन केल्यास देखील रुग्णाला योजनेच्या लाभ घेण्यासाठीची माहिती उपलब्ध आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्कः- डॉ.बालाजी गोरे-976586619, श्री. श्याम वाकळे-827592514

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow