राष्ट्रीय महीला आयोगाच्या अध्यक्ष यांनी घेतला महीला सुरक्षेबाबत आढावा

 0
राष्ट्रीय महीला आयोगाच्या अध्यक्ष  यांनी घेतला महीला सुरक्षेबाबत आढावा

शहरातील महिलांच्या सुरक्षेबाबत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय आढावा बैठक...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 21(डि-24 न्यूज) -

महापालिकेच्या मुख्यालयात महिलांच्या सुरक्षेबाबत तसेच कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती विजया रहाटकर, जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी श्री. दिलीप स्वामी, अपर पोलीस आयुक्त श्री. पंकज अतुलकर आणि महानगरपालिका आयुक्त श्री. जी. श्रीकांत उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान अध्यक्ष विजया रहाटकर यांनी माहिती दिली की, गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत राष्ट्रीय महिला आयोगाने छत्रपती संभाजीनगर मधील महिलांच्या सुरक्षेबाबत सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे तयार केलेल्या शिफारशीनुसार प्रेझेंटेशन करण्यात आले. उपाययोजनाबाबत तपशीलवार चर्चा झाली. त्यात प्रामुख्याने, शहरातील अंधाऱ्या व असुरक्षित भागांमध्ये प्रभावी रस्त्यांची प्रकाश व्यवस्था सुधारणे, सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, जेणेकरून महिलांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण होईल.

‘दामिनी पथक’ उपक्रमाच्या कार्याचे अध्यक्षांनी विशेष कौतुक केले व या पथकाच्या महिलांच्या सार्वजनिक सुरक्षेतील योगदानाची प्रशंसा केली.

महापालिका आयुक्त श्री. जी. श्रीकांत यांनी यावेळी माहिती दिली, की महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सार्वजनिक बसगाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून, त्याचे थेट नियंत्रण करण्यासाठी महापालिका मुख्यालयात स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे,

शहरभर नवीन रस्त्यांवर प्रकाश व्यवस्था उभारण्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. सार्वजनिक शौचालये शहरातील विविध ठिकाणी उभारण्याचे प्रस्तावित आहे, जे विशेषतः महिलांसाठी उपयुक्त ठरणार आहेत.

या बैठकीदरम्यान अध्यक्षांनी ‘पूर्व-विवाह सल्ला केंद्रे’ (Pre-Marital Communication Centres) शहरात स्थापन करण्याची गरज अधोरेखित केली. तसेच, POSH कायदा 2013 (महिलांचा कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंध, प्रतिबंधन आणि निवारण अधिनियम) अंतर्गत, 10 किंवा अधिक कर्मचारी असलेल्या सर्व कार्यस्थळांवर 'अंतर्गत समित्या' (Internal Committees – ICs) स्थापन करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

या अंमलबजावणीसाठी खालीलप्रमाणे दोन टप्प्यांमध्ये कृती आराखडा आखण्यात आला आहे :

पहिला टप्पा : POSH कायद्याबाबत जागरूकता आणि क्षमता विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून सर्व संबंधित घटक — नियोक्ते, कर्मचारी, तसेच नागरीक यांना संवेदनशील करणे.

दुसरा टप्पा : POSH कायद्यांतर्गत चौकशीची प्रक्रिया प्रभावीपणे राबवणे आणि तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करणे.

बैठकीच्या समारोपाप्रसंगी अध्यक्षांनी कार्यस्थळांवर लैंगिक संवेदनशीलता वाढवण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, POSH कायद्याअंतर्गत अंतर्गत व स्थानिक समित्यांची (IC/LC) रचना, कार्यपद्धती व त्याबाबत जनजागृती वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले. ही बहुआयामी आणि समन्वित उपाययोजना छत्रपती संभाजीनगर शहरात महिलांसाठी अधिक सुरक्षित, जागरूक आणि समावेशक वातावरण निर्माण करणारी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow