रेती माफिया व अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे गृह राज्यमंत्री कदम यांचे आदेश

 0
रेती माफिया व अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे गृह राज्यमंत्री कदम यांचे आदेश

समाजातील सौहार्द वाढविण्यासाठी उपक्रम राबवा- गृहराज्यमंत्री योगेश कदम...

रेती माफिया व अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे बैठकीत कदम यांनी दिले आदेश...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.14(डि-24 न्यूज)- आपल्या राज्यात सामाजिक सौहार्द वाढावे यासाठी पोलीस दलाने सर्व समाजातील लोकांना विशेषतः युवकांना एकत्र आणून विविध उपक्रम राबवावे व सामाजिक एकोपा निर्माण करावा, असे निर्देश राज्याचे गृह(शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज येथे दिले.

  येथील पोलीस आयुक्तालयात आयोजीत आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नितीन बगाटे, प्रशांत स्वामी, शिलवंत नागरेकर आदी सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय हद्दीतील पोलीस दलाच्या कामगिरीचा आढावा श्री. कदम यांनी घेतला. त्यात गुन्ह्यांचा तपास, प्रतिबंधात्मक कारवाई, वाहतुक, सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, जातीय दंगली, अंमली पदार्थ, अवैध रेती उपसा, दामिनी पथक, भरोसा सेल अशा विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. 

 बैठकीत माहिती देण्यात आली की, गेल्यावर्षभरात झालेल्या 5947 दाखल गुन्ह्यांपैकी 4709 गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला आहे. 5 लाख 62 हजार 091 वाहनांवर कारवाई करुन 4 कोटी 28 लाख 70 हजार 850 रुपये दंड आकारण्यात आला आहे.वाढते औद्योगिकीकरण आणि वाढते शहरीकरण यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढतांनादिसत आहे. आर्थिक गुन्हेगारी, सायबर गुन्हेगारी, अंमली पदार्थ असे गुन्हेही घडत आहेत. वर्षभरात अंमलीपदार्थ संदर्भातील 134 गुन्हे नोंदविण्यात आले. 40 लाख 47 हजार 652 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन 223 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. शहरी भागात ड्रोन पेट्रोलिंग, कमांड कंट्रोल सेंटर द्वारे सर्व हालचालींवर नियंत्रण ठेवले जाते अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

 श्री. कदम म्हणाले की, औद्योगिक गुंतवणूक वाढत असतांना येथिल सामाजिक सौहार्द वाढविणे व सलोखा टिकवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व समाजातील युवकांना, व्यक्तिंना एकत्र आणून उपक्रम राबवावे, त्यांचे परस्पर विचार देवाण घेवाण वाढवावी. त्यातून हे सौहार्द वाढून शांतता व सलोखा प्रस्थापित होईल असे पहावे. ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 100 दिवसांच्या सात कलम कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी. जिल्ह्यात अंमली पदार्थांबाबत कडक कारवाई करण्यात यावी. त्यात शिक्षक, पोलीस अधिकारी, पालक यांचाही सहभाग घ्यावा. तसेच जनजागृतीवर अधिक भर द्यावा. जिल्ह्यात बांगलादेशी अथवा रोहिंग्यांच्या रहिवासाबाबत असलेल्या प्रकरणांचा शोध घेण्यात यावा. पोलीस कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेला मुद्देमाल अनेक वर्षे तसाच पडून राहतो. त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात यावी, यासाठी राज्यशासन संयुक्तिक धोरण ठरवित आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. ई- ऑफिस प्रणालीचा अधिक वापर वाढवावा. जिल्ह्यात उद्योगांची गुंतवणूक वाढत असतांना अनेक लोक स्थलांतरीत होऊन येथे येतील. लोकसंख्या वाढेल अशा परिस्थितीत येथील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे हाताळण्यासाठी पोलीस दलाला अधिक अत्याधुनिक करण्यात येईल,असेही श्री. कदम यांनी सांगितले.

 बैठकीनंतर श्री. कदम यांच्या हस्ते चैतन्य तुपे अपहरण तपास कामांत कामगिरी बजावणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow