कुटुंब संस्था मजबूत करणे हाच मानस - रुपाली चाकणकर
‘कुटुंब’संस्था मजबूत करणे हाच मानस-रूपाली चाकणकर
जनसुनावणीत 152 तक्रारी निकाली
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.14(जिमाका)- कायद्याच्या चौकटीत राहून महिला सुरक्षेला प्राधान्य देत कुटुंब हा समाजाचा पाया भक्कम करण्याचा प्रयत्न महिला आयोगाच्या माध्यमातून करण्याचा मानस असल्याचे आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आज व्यक्त केला.
महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात करण्यात आली. यावेळी विविध पिडीत महिलांची जनसुनावणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी घेतली.जन सुनावणीस अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, आयोगाच्या सदस्य श्रीमती नंदिनी आव्हाडे, उपजिल्हाधिकारी डॉ.सुचिता शिंदे, पोलीस निरीक्षक तेजश्री पाचपुते, जनसुनावणीत आलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी चार पॅनल ची निर्मिती करण्यात आली होती. त्यात सतीश कदम, वर्षा गायकवाड, शिल्पा अवचार, आबाराव कलम, पूर्णिमा साखरे, स्वाती लोखंडे आदी सदस्य तसेच विधी तज्ज्ञ, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदस्य, पोलीस प्रशासन तसेच जिल्हा महिला बालविकास कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
श्रीमती चाकणकर म्हणाल्या की, तक्रारदार महिलांना न्याय मिळावा यासाठी त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात सुनावणीची सुविधा उपलब्ध व्हावी. त्यांचा प्रवास खर्च, वकिलांची फी वाचावी. तसेच मार्गदर्शनासाठी समुपदेशन सुविधा ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाद्वारे त्याच जिल्ह्यात ऐकून घेऊन तात्काळ तडजोड करून तक्रार निकाली काढली जाते. कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी जास्त प्रमाणात येत आहेत. कायद्याच्या चौकटीत राहून जीवन जगल्यास तक्रार होत नाहीत. महिला सबलीकरणाचा केंद्रबिंदू हा कुटुंब आहे. मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी प्रत्येक आईने पुढाकार घेऊन मुलीच्या जन्माचे स्वागत करावे. बालविवाह रोखण्यासाठी ग्रामसभेमध्ये जाणीव जागृती होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
152 तक्रारी निकाली
जन सुनावणीत एकूण 152 तक्रारीची सुनावणी घेण्यात आली. त्यात 96 तक्रारी या कौटुंबिक समस्यांच्या होत्या. तसेच 11 तक्रारी सामाजिक समस्यांशी संबंधित, मालमत्ता व आर्थिक फसवणूकीच्या 3 व इतर 42 अशा 152 तक्रारी होत्या. या सर्व तक्रारी निकाली काढण्यात आल्या. कौटुंबिक समस्यांच्या 96 पैकी 14 तक्रारींमध्ये समेट घडविण्यात आला.
भिसेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचे कौतुक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,भिसेवाडी येथील विद्यार्थिनीने ‘गुड टच बॅड टच’ यावर लघुपटामध्ये काम करून विद्यार्थिनींमध्ये जाणीव जागृतीसाठी काम केल्याबद्दल अभिनंदन केले. या विद्यार्थिनींचा उत्साह आणि सहभागाबद्दल रूपाली चाकणकर यांनी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करून त्यांच्याशी संवाद साधला व आनंद व्यक्त करत, निर्भय वातावरणात शिक्षण घ्यावे, असे मार्गदर्शन केले.
विविध विभागांचा आढावा
श्रीमती रूपाली चाकणकर यांनी बालविवाह प्रतिबंध, महिला आरोग्य, समुपदेशन केंद्र, भरोसा सेल, परिवहन, कामगार आयुक्त त्याचप्रमाणे समाज कल्याण, शिक्षण, महिला बाल विकास या विभागांचा आढावा घेतला. आढावा बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे. पोलीस निरीक्षक आरती जाधव, सामाज कल्याण सहाय्यक आयुक्त लकीचंद चव्हाण, उपयुक्त महानगरपालिका श्री बोरसे सहाय्यक कामगार आयुक्त श्रीमती गायकवाड ,सहाय्यक संचालक औद्योगिक सुरक्षा. श्रीमती गीता तांदळे उपशिक्षण अधिकारी. जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेशमा चिमंद्रे ,जिल्हा महिला बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी या आढावा बैठकीस उपस्थित होते.
बालविवाह प्रतिबंधासाठी खबर देणाऱ्या व्यक्तीस विशेष बक्षीस देण्यात यावे. तसेच बालविवाहास प्रतिबंध करणाऱ्या घटकांना विविध पुरस्कार देण्याचेही घोषित करण्यात आले. सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये दर्शनी भागात विद्यार्थ्यांना चाईल्ड हेल्पलाइन 1098 चे फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले.
सर्व कार्यालये, आस्थापनांमध्ये अंतर्गत महिला तक्रार निवारण समित्या स्थापन करण्याबाबतचे निर्देश दिले व बालकामगार तपासणीसाठी अचानक भेटी देण्याचे आदेश दिले. शाळा महाविद्यालयात सुद्धा पोलीस विभागाने अचानक भेट देऊन तेथील वातावरण सुरक्षित असल्याची भावना मुलींमध्ये निर्माण करावी. वाढत्या लोकसंख्येच्या शहरानुसार समुपदेशन केंद्रांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव संबंधित पोलीस शिक्षण आणि महिला बालकल्याण विभागाने पाठवावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पिंक पथक, दामिनी आणि भरोसा सेलचे केले कौतुक
महिला सुरक्षितता, समुपदेशन आणि इतर कायदेशीर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी फास्ट ट्रॅकवर करण्यात आलेला तपास याबाबत ‘पिंक पथक’ चे व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या सुरक्षितेसाठी दामिनी पथकाने केलेल्या कार्याचे कौतुकही यावेळी श्रीमती चाकणकर यांनी केले. समुपदेशन केंद्राच्या अंतर्गत भरोसा सेल ज्या काही सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यामध्ये खऱ्या अर्थाने महिलांमध्ये एक विश्वास पोलीस विभागामार्फत निर्माण झाल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
हेल्पलाईन क्रमांक महिलांपर्यंत पोहोचवा
महिला, लहान बालकांच्या मदतीसाठी शासनाने विविध हेल्पलाईन क्रमांक सुविधा उपलब्ध केल्या असून हे क्रमांक अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवावे असे आवाहन श्रीमती चाकणकर यांनी केले.
हेल्पलाईन क्रमांक याप्रमाणे-
पोलिसांची तात्काळ मदत -112
पोलीस नियंत्रण कक्ष-0240-2240500
भरोसा सेल – 0240-2326490
चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक - 1098
महिला हेल्पलाइन-1091
ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन -1090
दामिनी पथक हेल्पलाइन-9225588492
What's Your Reaction?