लाचलुचपत विभागाच्या वतीने आतापर्यंत 115 लोकसेवकांविरुध्द कारवाई, लाच देऊ नका, संपर्क करा

दक्षता जनजागृती सप्ताह
लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत जानेवारीपासून 115 लोकसेवकांविरुद्ध कारवाई; जनजागृतीवर भर
औरंगाबाद,दि. 1(डि-24 न्यूज)- लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दि.30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर याकालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करुन भ्रष्टाचाराविरुद्ध विविध उपक्रमांतून लोकांमध्ये जनजागृती केली जाते. दरम्यान विभागाने जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान 115 लोकसेवकांविरुद्ध कारवाई केली आहे. लोकसेवकांकडून आपले कामकाज करुन घेतांना लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी निर्भयपणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधावा. त्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 1064 हा टोल फ्री क्रमांकही जारी केला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद अंतर्गत औरंगाबाद, जालना, बीड, धाराशिव या जिल्ह्यांचाही समावेश होतो. या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये हे जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहे. जानेवारी ते ऑक्टोंबर 2023 या कालावधीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरुन लाचखोरांविरुद्ध कारवाई केली आहे. त्यात 115 लोकसेवकांचा समावेश आहे. त्यात वर्ग 1- चे एक, वर्ग 2 चे 22, वर्ग 3 चे 80, वर्ग 4 चे 14 अन्य लोकसेवक 22 आणि खाजगी व्यक्ती 22 यांचा समावेश आहे.
दक्षता जनजागृती सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन
दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त दि.30 ऑक्टोंबर रोजी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेऊन या सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. यानिमित्त हस्तपत्रके वाटणे, पोस्टर्स,स्टिकर्स याद्वारे जनजागृती करुन माहिती दिली जात आहे.जिल्ह्यात ठिकठिकाणी शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन त्यांच्यात भ्रष्टाचाराविरुद्ध जागरुकता निर्माण केली जात आहे. हे उपक्रम दि.5 पर्यंत सुरु राहणार आहेत.
नागरिकांनी 1064 वर कॉल करावा
लोकसेवकांकडून लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी 1064 वर कॉल करावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांनी केले आहे. हा क्रमांक 24X7 सुरु असतो. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यास भ्रष्टाचारी लोकसेवक पकडले जाऊन त्यांना न्यायालयातून शिक्षा होते. नागरिकांनी केलेल्या तक्रारी संदर्भात पूर्ण गुप्तता पाळली जाते. अधिक माहितीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे- 9923023361, उपअधीक्षक राजीव तळेकर-9823498777, दिलीप साबळे-9545950421, गोरखनाथ गांगुर्डे-9503736351, श्रीमती संगिता पाटील-8766755515
What's Your Reaction?






