विधानसभा निवडणूक, बिनचूक कामासाठी जिल्हाधिका-यांनी दिली दशसुत्री उपाययोजना
 
                                विधानसभा निवडणूक २०२४; कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
बिनचुक कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली दशसूत्री उपाययोजना
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज)- जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात निवडणूक तयारीने वेग घेतला असून निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आज आयोजित करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रनिहाय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडले. निवडणूक कामकाज करतांना १० सुत्रांचे पालन करावे, त्यामुळे आपले काम हे बिनचुक आणि यथायोग्य होईल,असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना दिले.
१०४-सिल्लोड, १०५- कन्नड, १०६- फुलंब्री, १०७- औरंगाबाद मध्य, १०८-औरंगाबाद पश्चिम, १०९-औरंगाबाद पूर्व, ११०- पैठण, १११-गंगापूर, ११२- वैजापूर या सर्व विधानसभा मतदार संघात आज प्रशिक्षण पार पडले. प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया, मतदान यंत्र हाताळणी, मतदान केंद्राची रचना इ. बाबत प्रशिक्षण देण्यात आले.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज १०६- फुलंब्री, १०७- औरंगाबाद मध्य, १०८-औरंगाबाद पश्चिम, १०९-औरंगाबाद पूर्व येथील प्रशिक्षणांना भेटी दिल्या व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी स्वामी यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाज करतांना १० सुत्रांची अंमलबजावणी करावी असे सांगितले. त्यात पारदर्शकता, परिपुर्णता, वक्तशिरपणा, मतदान यंत्र-मतपत्रिका बाबत खबरदारी, मतदान केंद्र-मतदार यादी बाबत काळजी, समन्वय-सहकार्य आणि सहमती, खात्रीशीरपणा, तणावमुक्ती, अभ्यास आणि आरोग्य अशा १० सुत्रांवर काम करावे. यावर अंमलबजावणी केल्यास आपले निवडणूक कामकाज आपण यशस्वीरित्या पूर्ण करु शकाल असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी उपस्थितांना सांगितले.
याप्रशिक्षणांना निवडणूक निरीक्षक तलत परवेज, श्रीमती कोर्रा लक्ष्मी तसेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी ब्रजेश पाटील, चेतन गिरासे, व्यंकट राठोड, उमाकांत पारधी तसेच सहा. निवडणूक निर्णय अधिकारी आदी उपस्थित होते
 
.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            