व्हाॅईस ऑफ मीडीया हे पत्रकारांचे कुटुंब - संदीप काळे

 0
व्हाॅईस ऑफ मीडीया हे पत्रकारांचे कुटुंब - संदीप काळे

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ हे पत्रकारांचे कुटुंब :संदीप काळे

व्हॉईस ऑफ मीडियाची राज्य बैठक उत्साहात पार पडली :

व्हॉईस ऑफ मीडिया राज्यात घेणार सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी पत्रकारांसाठी प्रशिक्षण...  

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज) - “पत्रकारितेला आज खऱ्या अर्थाने संघटित लढाईची गरज आहे. एकट्याने लढणारा पत्रकार असुरक्षित असतो, पण संघटित पत्रकार कधीही झुकत नाही. म्हणूनच ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ हे केवळ संघटन नाही, तर पत्रकारांचे कुटुंब आहे. महाराष्ट्रातील ही बैठक भविष्यातील पत्रकार चळवळीला नवी दिशा देईल, असा मला विश्वास आहे.”

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ची राज्य बैठक शनिवारी (7 सप्टेंबर) संभाजीनगर येथे सुभेदारी गेस्ट हाऊस येथे उत्साहात पार पडली. संस्थेचे संस्थापक व आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला मराठवाड्यासह महाराष्ट्रातील विविध विभागातील प्रमुख पदाधिकारी, संपादक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी 10 वाजता बैठकीला सुरुवात झाली. सुरुवातीला राज्य संयोजक कुमार कडलक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर ट्रस्टी परवेज खान यांनी व्हॉईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामगिरीचा आढावा घेतला.

या बैठकीत संदीप काळे यांनी उपस्थित पत्रकारांना संबोधित करताना सांगितले की, “पत्रकार हा फक्त वृत्त सांगणारा नसतो, तर तो समाजाचा मार्गदर्शक असतो. लोकशाहीला दिशा दाखवण्याचे काम पत्रकारांच्या लेखणीतून होते. परभणीच्या छोट्याशा गावातून सुरू झालेली ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची चळवळ आज 52 देशांपर्यंत पोहोचली आहे, हे केवळ संघटनेचे नव्हे तर पत्रकारितेचे यश आहे. डिजिटल युग बदलत आहे. बातमीचा वेग, माहितीचा प्रवाह, तंत्रज्ञानाचा वापर—यामुळे पत्रकारांपुढे नवी आव्हाने निर्माण झाली आहेत. आज पत्रकाराला सुरक्षिततेची, कायदेशीर मदतीची आणि तांत्रिक प्रशिक्षणाची नितांत गरज आहे. हाच आमच्या संघटनेचा केंद्रबिंदू आहे. आम्ही पत्रकारांना फक्त संघटनात्मक बळ देत नाही, तर त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहतो.”

महिला पत्रकारांचा विशेष उल्लेख करत काळे म्हणाले की, “स्त्री पत्रकारितेचा आवाज बुलंद करणे, त्यांना स्वतंत्र मंच उपलब्ध करून देणे, ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. त्याचबरोबर उर्दू पत्रकारांना त्यांच्या मातृभाषेत व्यासपीठ, डिजिटल पत्रकारांना मार्गदर्शन, तसेच साप्ताहिक, टीव्ही आणि रेडिओ पत्रकारांना सक्षम करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.” ते पुढे म्हणाले की, “पत्रकारितेला आज खऱ्या अर्थाने संघटित लढाईची गरज आहे. एकट्याने लढणारा पत्रकार असुरक्षित असतो, पण संघटित पत्रकार कधीही झुकत नाही. म्हणूनच ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ हे केवळ संघटन नाही, तर पत्रकारांचे कुटुंब आहे. महाराष्ट्रातील ही बैठक भविष्यातील पत्रकार चळवळीला नवी दिशा देईल, असा मला विश्वास आहे.”

भाषणाच्या शेवटी संदीप काळे यांनी सर्व पत्रकारांना एकत्र राहण्याचे आवाहन करत सांगितले की, “आपण एकत्र राहिलो, तर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात पत्रकारांवर अन्याय होऊ शकणार नाही. पत्रकारांच्या लेखणीतील शाई ही फक्त शब्द नाहीत, तर ती लोकशाहीच्या श्वासांची ताकद आहे. या ताकदीसाठी आपण सर्वांनी खांद्याला खांदा लावून लढले पाहिजे.” या बैठकीत उर्दू विभागासाठी नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा करण्यात आली. महिला विंग व राज्य कोर टीमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. आगामी राष्ट्रीय अधिवेशनासाठी महाराष्ट्राची कार्ययोजना निश्चित करण्यात आली तसेच मराठवाड्यातील पत्रकारांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या.

या बैठकीस ट्रस्टी परवेज खान, राज्य संयोजक कुमार कडलक, साप्ताहिक विभागाचे राज्य कार्याध्यक्ष अब्दुल कय्यूम, किशोर महाजन, शेख लाल शेख, सय्यद करीम, वामन पाठक, डॉ. शकील शेख, दिशा आकाश सुरवसे पाटील, महिला जिल्हाध्यक्ष ज्योती हांगे, सय्यद शब्बीर, संजय हिंगोलीकर, बबन सोनवणे, मोहम्मद इसाक, सय्यद करीम, नदीम सौदागर, सुजित ताजने, डॉ भारती मुरकुटे, शेख शाफिक, विजय औवसरमल आरेफ देशमुख, शेख सईद, अनिस रामपूरे, शेख अनिस, सुरेश क्षीरसागर यांच्यासह विविध जिल्ह्यांतील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अनेक पत्रकार महिलांना निवडीचे प्रमाणपत्र संदीप काळे यांच्या हस्ते करण्यात आले. अनेक मान्यवर उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow