शहर ड्रग्ज मुक्त करण्यासाठी नागरीकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे - पोलिस आयुक्त प्रविण पवार

शहराला ड्रग्जमुक्त करण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे - पोलिस आयुक्त प्रविण पवार
ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीच्या उद्घाटनप्रसंगी पोलीस आयुक्त पवार यांचे आवाहन, शांतता व सद्भावनेचा संदेश देत जुलुस-ए-मोहंमदीत हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज) - तरुण पिढीला ड्रग्जचे व्यसन लावून आयुष्य खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थ्यांना सुध्दा हे व्यसन लावले जात आहे. त्यामुळे ड्रग्ज व्यवसायात सहभागी असलेल्यांवर कडक कारवाई केली जात आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून शहरात जनजागृती केली जात आहे. ड्रग्ज विक्रेत्यांवर मकोका, तडीपार व एमपीडीए अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांची धिंड काढली जात आहे. शहर ड्रग्ज मुक्त करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य केले तरच हे सर्व थांबवता येईल, असे आवाहन पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी आज ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीच्या उद्घाटनप्रसंगी केले. प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांच्या 1500 व्या जन्मदिनानिमित्त ईद-ए-मिलादुन्नबी पारंपारिक पध्दतीने शांततेत उत्साहात साजरी करण्यात आली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ईद मिलादची मिरवणूक 2 दिवस उशिरा काढण्यात आली. शहागंज येथील निजामुद्दीन चौकात मिरवणुकीच्या सुरुवातीला जुलूस-ए-मोहम्मदी इंतेजामिया कमिटीचे निमंत्रक डॉ.शेख मुर्तुजा यांनी मिरवणुकीची माहिती देताना लोकांना शिस्तीचे पालन करून मिरवणूक यशस्वी करण्याचे आवाहन केले. यावेळी समितीचे अधिकारी असदुल्ला खान तरार, ॲड. झियाउद्दीन बियाबानी, डॉ. अशफाक इक्बाल, काझी शकील, एजाज झैदी, मुकर्रम बागवाला, ॲड. मेहबूब निजामी, काझी शरीक, शिया समाजाचे अमील मिर्झा मुकर्रम अली, माजी महापौर रशीद खान मामू, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ, एमआयएम नेते नासेर सिद्दीकी, राष्ट्रवादीचे नेते इलियास किरमानी, नवीन ओबेराॅय, शेख वसीम, उपायुक्त डीसीपी पंकज अतुलकर, सहायक पोलिस निरीक्षक संपत शिंदे, सिटी चौक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक निर्मला परदेशी व्यासपीठावर उपस्थित होते.
पोलिस आयुक्त प्रवीण पवार पुढे म्हणाले की, शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागातही अंमली पदार्थांचा व्यवसाय फोफावत आहे. त्यामुळे येणारी पिढी उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. आणि त्यांना वाचवण्यासाठी आणि ड्रग्ज व्यापार थांबवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. 16 ते 18 वर्षांच्या मुलांना ड्रग्जचे व्यसन लावले जात आहे. याचा त्रास त्यांच्या पालकांना आणि समाजालाही होत आहे. ड्रग्जचे व्यसन लागल्यानंतर मुले घरात चोरी करत आहेत. यामुळे गुन्हेगारी वाढत आहे. ड्रग्जचा व्यापार थांबवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.
कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी..
पोलिस आयुक्तांनी नागरिकांना 9226514001 हा वैयक्तिक क्रमांक दिला आणि माहिती देणाऱ्याचे नाव आणि मोबाईल क्रमांक गुप्त ठेवला जाईल असे त्यांनी सांगितले. न घाबरता ड्रग्ज व्यापारात सहभागी असलेल्यांची नावे सांगा, सर्वांसाठी व्यवस्था केली जाईल. शहराचा विकास होत आहे. एक लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे. वाहन उद्योग आल्यानंतर शहराची प्रगती होत आहे. अलीकडेच शहर विकासासाठी अतिक्रमणे हटवण्यात आली. शहरात हिंदू आणि मुस्लिमांची एकता दिसून येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. शहरातील सर्व सण शांततेत साजरे केल्याबद्दल पोलिस आयुक्त पवार यांनी नागरिकांचे अभिनंदन केले. भविष्यातही त्यांना सौहार्दाने राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
दर वर्षीप्रमाणे या वर्षीही राजेंद्र पिंपळे यांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांचे स्वागत राजाबाजार परिसरात 50 किलो जिलेबी, समोसे देऊन केले. त्यांनी निमंत्रक शेख मुर्तुजा यांचे फुलांनी स्वागत केले आणि त्यांना 1500 व्या ईद मिलादुन्नबी उत्सवानिमित्त एक मोमेंटो दिला. आणि त्यांनी काही काळ मिरवणुकीत सहभाग घेतला. पिंपळे म्हणाले की ते गेल्या 17 वर्षांपासून मिरवणुकीचे स्वागत करत आहेत आणि मिठाई वाटत आहेत. हे हिंदू मुस्लिम बंधुत्वाचे भाईचाराचे उदाहरण आहे.
वृद्ध आणि लहान मुले हातात झेंडे घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते. लहान मुलांना 4 घोड्यांवर बसवण्यात आले होते. ते सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र होते. याशिवाय लोकांनी त्यांच्या लहान मुलांना सजवून आणले.
ध्वजारोहण करुन केले अन्नदान...
शहरात विविध ठिकाणी अन्नदान, गोड पदार्थ आणि शरबतची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे गोड पदार्थांचे वाटप करण्यासाठी ठिकठिकाणी मंडप टाकून व्यवस्था करण्यात आली होती. चम्पा चौक, शहाबाजार, निशाण, मोमिनपुरा, बुढ्ढीलेन, जुना बाजार, सिटी चौक, गांधी पुतळा इत्यादी ठिकाणी संयोजक डॉ. शेख मुर्तुजा यांनी ध्वजारोहण केले. दरम्यान, विविध ठिकाणी सर्व जाती आणि धर्माच्या नागरिकांनी समितीच्या अधिकाऱ्यांचे फुले देऊन स्वागत केले. निजामुद्दीन चौकात ध्वजारोहणानंतर मिरवणुकीचा समारोप झाला.
What's Your Reaction?






