संवाद, समन्वयातून होईल आनंददायी गणेशोत्सव - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 0
संवाद, समन्वयातून होईल आनंददायी गणेशोत्सव - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

संवाद, समन्वयातुन होईल आनंददायी गणेशोत्सव- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.30(डि-24 न्यूज)- गणेशोत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांसोबत संवाद, सर्व संबंधित शासकीय विभागांमध्ये समन्वय आणि समाजकंटकांवर केलेली प्रतिबंधात्मक कारवाई या त्रिसुत्रीचा अवलंब केल्यास यंदाचा गणेशोत्सव हा आनंददायी व निर्विघ्न होईल,असा विश्वास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज व्यक्त केला.

 लवकरच येऊ घातलेल्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल व पोलीस प्रशासन यांची संयुक्त आढावा बैठक संपन्न झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा विधी अधिकारी उषा वायाळ ,पोलीस उपायुक्त महेक स्वामी, सुनील लांजेवार जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पोलीस निरीक्षक उपस्थित होते. 

 जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, कायदा सुव्यवस्था अबाधित राखून शांतता प्रस्थापित व्हावी व नागरिकांना उत्सव शांततेत अनुभवता यावा यासाठी विविध गणेश मंडळ ,पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांनी समन्वय, संवाद ठेवावा. पोलीस विभागाने प्रतिबंधात्मक कारवाई करून समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी. विविध गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद व समन्वय बैठका घ्याव्या. नियंत्रण कक्ष कार्यान्वित ठेवून कोणतीही आपत्ती येऊ नये याबाबत दक्षता घ्यावी. गणेश उत्सवात श्रीगणेशाची प्रतिष्ठापना, मिरवणूक व विसर्जन यावेळी गर्दीचे नियंत्रण, नियमन व अनुचित प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेराची स्थापना संवेदनशील ठिकाणी करण्यात यावी. या उत्सवादरम्यान महिला, मुली, वृद्ध यांची विशेष काळजी घेण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.                              

 पोलीस अधीक्षक डॉ.विनय कुमार, राठोड म्हणाले की गणेशोत्सवाची पूर्वतयारी सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याबाबत योग्य ती काळजी सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी. स्थापनेच्या दिवशी, व विसर्जन होणाऱ्या मिरवणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली जावी. विविध गणेश मंडळांच्या स्वयंसेवकांच्या नावांची यादी संबंधित पोलीस स्टेशनला अद्यावत असावी. गर्दीच्या वेळी या स्वयंसेवकांचे सहाय्य उपयुक्त ठरते. मिरवणुकीत डीजे ऐवजी पारंपारिक वाद्याला प्राधान्य द्यावे,असे आवाहन नागरिकांना गणेश मंडळाला करण्यात यावे,असेश्री. ऱाठोड यांनी सांगीतले.  

 निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी सांगितले की, गणेशोत्सवाची वर्गणी गोळा करताना नागरिकांना जबरदस्ती किंवा आग्रह करू नये. मूर्ती स्थापनेची जागा स्वच्छ असावी. विसर्जनाच्या ठिकाणाबाबतही अशीच दक्षता संबंधित गणेश उत्सव समितीने घ्यावी. नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्याबाबत योग्य ती दक्षता पोलीस प्रशासनाने घ्यावी. वाहनचालक यांनी योग्य ती काळजी घ्यावी. मिरवणुकीचे मार्ग, गर्दीचे योग्य नियोजन करून भाविकांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि गणेश उत्सव समितीने संयुक्त प्रयत्न करावे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow