सरकार घाबरल्याने निवडणूक पुढे ढकलण्याचे षडयंत्र करत असल्याचा नाना पटोलेंचा आरोप...!
सरकार घाबरल्याने निवडणूक पुढे ढकलण्याचे षडयंत्र करत असल्याचा नाना पटोलेंचा आरोप...!
सर्वेत ज्याचे नाव त्यांना तिकीट, जातपात बघणार नाही, नवीन चेह-यांना संधी...
इच्छूकांनी ढोलताशांच्या गजरात केले शक्ती प्रदर्शन, बैठकीच्या स्थानी व शहरात बॅनरबाजी, मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील सक्षम नेत्यांना उमेदवारी देणार असल्याचे पटोलेंनी सांगितले... नवनिर्वाचित खासदारांचा यावेळी सत्कार करण्यात आला...
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.12(डि-24 न्यूज) उद्यापासून काँग्रेस राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वे करणार आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीकडे हजारो इच्छूकांनी 288 जागेसाठी उमेदवारी मागितली आहे. नांदेड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून एक हजार इच्छूकांनी उमेदवारी मागितली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर हवा बदलायला सुरुवात झाली आहे. नांदेड येथील अशोक चव्हाण यांच्या गेल्याने मराठवाड्यात फरक पडेल असे काँग्रेस पक्षाच्या विरोधकांना वाटले होते तसे न होता मराठवाड्यातून तीन खासदार मतदारांनी निवडून दिले त्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जनतेचे आभार मानले. सर्वेत ज्याचे नाव त्याला तिकीट देणार आहे. यामध्ये जात पात बघणार नाही. मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील सक्षम नेत्यांना जे निवडून येतील जनतेने ठरवलेला उमेदवार देणार. कोणत्याही समाजाला डावलणार नाही. सर्व समाज व मुस्लिम अल्पसंख्याक समाज महाविकास आघाडीसोबत आहे नाराज नाही असे त्यांनी पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस पक्ष कसा जिंकेल हि भुमिका कार्यकर्त्यांनी घ्यावी. दिल्लीत जाऊन आपल्या भुमिला बदनाम करण्याचे काम काही लोक करत आहे त्यांनी आता तरी सुधरावे. ते कोण लोक आहेत ते मला माहित आहे. असा इशारा त्यांनी आयोजित बैठकीत दिला.
मुख्यमंत्र्यांचा चेहरा कोण याबाबत ते म्हणाले अगोदर निवडणूक जिंकायचे ध्येय महाविकास आघाडीचे आहे. मुख्यमंत्री कोण होणार ते नंतर ठरेल. अगोदर महाराष्ट्राची अस्मिता जपायची आहे. ते महत्त्वाचे आहे. मी, शरद पवार व उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल एकही वक्तव्य केले नाही. म्हणून त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या वादावर पडदा टाकला.
उमेदवारी देताना पाच पाच वेळा उमेदवारी दिलेल्यांचा विचार केला जाणार नाही नवीन चेह-यांना संधी देणार. विधानपरिषद निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाला डावलले याबद्दल समाजात नाराजी असल्याची माहिती मिळाली विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे अधिक लक्ष दिले जाईल. महायुतीला सर्वेत शंभर जागाही मिळणार नाही असे समजल्याने नवनवीन योजनांचे निर्णय घेतले जात आहे. म्हणून सरकार एक महीना उशिरा निवडणूक घेण्याचे षडयंत्र करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.
पुढे ते म्हणाले लोक बेरोजगारी, महागाईने त्रस्त झाले आहेत. त्यांना आता बदल हवा आहे. कमिशनखोरीने लोक कंटाळले आहेत. शेतकरी, शेतमजूर, महीला मध्ये या सरकार विरोधात रोष आहे. म्हणून लाडकी बहीण, लाडका भाऊ सारख्या योजना सुरू केल्या. त्या योजनेला विरोध नाही परंतु महागाई कमी करा, विज बिल कमी करा. कर्नाटक राज्यात काँग्रेसने महालक्ष्मी योजना सुरू केली. आमचे सरकार आले तर महीलांसाठी अशी वेगळी योजना सुरू करु. महायुती सरकारचा घोषणांचा पाऊस सुरू आहे. सरकारने राज्यावर दहा लाख कोटींचा कर्जाचा डोंगर उभा केला आहे. जन्माला येणाऱ्या बालकांवर 70 हजारांचे कर्ज आहे. सरकारकडे देण्यासाठी पैसे नाहीत. मराठवाड्यात 7 महीन्यात 511 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तरीही त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकारकडे पैसा नाही. महायुती सरकार शेतकरी विरोधी आहे अशी टीका पटोलेंनी केली.
महागाईने जनता त्रस्त असताना समृध्दी महामार्गासाठी कोट्यवधी रुपयांचे कर्ज करुन ठेवले. महीला बेपत्ता होत आहे महीलांची सुरक्षा, गुन्हेगारी वाढली, वीजबिल वाढले, भ्रष्टाचार वाढला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तीन वर्षांपासून निवडणूक नाही. प्रशासक कोणाचे ऐकत नाही. जनतेच्या घामेच्या पैशाची लूट सुरू आहे. त्यामुळे विकासकामे खोळंबली. 40 वर्ष समृध्दीला काही होणार नाही असे सांगितले तरीही या रस्त्याला तडे गेले. अशी टिका त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
हे सरकार शेतकरी विरोधी आहे. सर्वात जास्त आत्महत्या कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात झाले. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने काहीच पावले उचलली नाहीत. नवीन गुंतवणूक नाही. उद्योग गुजरातला पळवले. राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. रोजगार नाही, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव नाही. आमच्याच योजनांचे नाव बदलून सरकार योजना चालवत आहे अशी टीका राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पत्रकार परिषदेत केली.
एका हाॅटेलात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत औरंगाबाद आणि जालन्याची आढावा बैठक झाली. यामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला, विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार, माजीमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष आरेफ नसिम खान, माजीमंत्री अमित देशमुख, सतेज पाटील, खासदार डॉ.कल्याण काळे, खासदार शिवाजीराव काळगे, माजी आमदार एम.एम.शेख, अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष डॉ.वजाहत मिर्झा, इब्राहिम पठाण, माजीमंत्री अनिल पटेल, केशवराव औताडे, विलास औताडे, शहराध्यक्ष युसुफ शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
What's Your Reaction?